मॉस्को – रशियातील प्रमुख विरोधी नेते आणि अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक ऍलेक्सी नवालनी यांना आर्थिक गैरव्यवहार आणि न्यायालयाच्या अवमानाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना 9 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
त्यांच्यावर असलेल्या आरोपांसाठी त्यांना सुनावण्यात आलेली ही सर्वात जास्त शिक्षा आहे. नवालनी यांना 1.2 दशलक्ष रुबल इतका दंडही ठोठावण्यात आला आहे.
नवालनी सध्या मॉस्कोच्या पूर्वेकडील तुरुंगात अडीच वर्षांची शिक्षा भोगत आहेत. नवालनी यांनी दीर्घकाळासाठी तुरुंगातच ठेवता यावे, म्हणून ही जास्तीची शिक्षा देण्यात आली आहे, असे त्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे. आपल्यावरील सर्व आरोप नवालनी यांनी फेटाळून लावले आहेत. हे आरोप “बोगस’ आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.