नवी दिल्ली – झिंबाब्वेच्या अध्यक्षपदी इम्मेर्सन नान्गाग्वा यांची फेरनिवड करण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झानू-पीएफ या सत्तारूढ पक्षाकडून गैरप्रकार केले गेल्याचे आरोप मोठ्या प्रमाणावर झाले होते. नान्गाग्वा यांना नेल्सन चामिसा यांनी प्रखर आव्हान दिले होते. नान्गाग्वा यांची अध्यक्षपदाची एक टर्म पूर्ण झाली असल्यामुळे त्यांच्याविरोधात आव्हान होते.
नान्गाग्वा यांना आणखीन एकदा अध्यक्ष होण्याची मुभा असल्याने ते पुन्हा अद्यक्षपद मिळवण्यासाठी उत्सुक होते. झिंबाब्वेला 1980 मध्ये ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून झानू-पीएफ पक्षाने राष्ट्रीय राजकारणावर आपली पकड कायम ठेवली आहे.
झिंबाब्वेमध्ये गेल्या दशकभरापासून आर्थिक धोरणाबाबतच्या समस्या आहेत. तेथे महागाई, बेरोजगारी या समस्यांबरोबर वैद्यकीय सुविधांचा अभावदेखील आहे. किमान औषधे आणि उपकरणांचीही तेथे वानवा आहे. देशावर 18 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोपही होतो आहे. पाश्चात्य देशांकडून मिळणारी सावत्रपणाची वागणूक कमी करण्यासाठी नान्गाग्वा हे आगामी पाच वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ही परिस्थिती दूर करण्याचा प्रयत्न करतील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.