कर्जत, (प्रतिनिधी) : समर्थ विद्यालय हे आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत समर्थ शाळेला तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबद्दल शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समर्थ विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यांचे संस्थाध्यक्ष नामदेव राऊत, सचिव वैभव छाजेड, संस्था निरीक्षिका उषा राऊत, गटविकास अधिकारी प्रमोद शेंडगे, गटशिक्षणाधिकारी उज्वला गायकवाड, विस्तार अधिकारी देवराम लगड, चौधरी, केंद्रप्रमुख लबडे या सर्वांनी अभिनंदन केले.
समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने अतिशय अल्प कालावधीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारे विद्यालय म्हणून ठसा उमटवला आहे.
मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत कर्जत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून देण्यात विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालकांचे एकत्रित प्रयत्न असून, यापुढेही विद्यालय आपला नावलौकिक असाच वाढवत राहील, असा विश्वास प्राचार्य चंद्रकांत राऊत यांनी व्यक्त केला.