पाथर्डी – स्वातंत्र्यपूर्व काळात माधवराव निऱ्हाळी यांनी तालुक्यातील गोरगरिबांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी, यासाठी एकलव्य शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर स्व. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी या संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला.
आपण संस्थेच्या गुणात्मक विकास होण्यासाठी आराखडा तयार केला असून मोठ्या शहरातील शैक्षणिक दर्जा मिळवून देऊन निव्वळ व्यावसायिक शिक्षण म्हणून नाही तर भौतिक गुणवत्ता वाढीसाठी आपल्याला यापुढे काम करायचे आहे. त्यासाठी साथ महत्त्वाची आहे, असेआवाहन एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड.प्रताप ढाकणे यांनी केले.
एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अँड.प्रताप ढाकणे यांचा सन्मान समारंभ तसेच तंत्रनिकेतन विभागातील शिक्षक सुधाकर सानप यांच्या सेवापूर्ती निरोप समारंभात ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, एम. एम. निऱ्हाळी विद्यालयाचे प्राचार्य संजय घिगे, विश्वस्त श्रीकांत निऱ्हाळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश रासने, संस्थेचे अधीक्षक शिवाजी बडे ,धन्यकुमार गुगळे, एमडी फुंदे, एस. पी. तुपे उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश सरोदे यांनी तर विष्णु बुगे यांनी आभार मानले.