Pooja Sawant: मराठी सिनेसृष्टीत पूजा सावंतचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. अभिनयासह तिचे नाव लव्हलाइफमुळे देखील चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पूजा सावंत हिने आपल्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर करून, आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याचे म्हटले. सिद्धेश चव्हाणशी (Siddhesh Chavan) लग्नगाठ बांधणार असल्याचे अभिनेत्रीने यावेळी सांगितले.
इतक्या वर्षानंतर पूजाचा जोडीदार अखेर समोर आल्यानंतर तिच्या फॅन्सला देखील आनंद झाला आहे. एकीकडे तिने तिच्या पर्सनल लाइफविषयी मोठा खुलासा केल्यानंतर आता पूजा तिच्या गावी पोहचली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या पूजा तिच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा ब्रेक घेतला आहे. पूजा सध्या तिच्या गावी म्हणजेच कोकणात गेली आहे. त्यामुळे गावी गेल्यानंतर ती निवांतपणे राहत असल्याचं दिसून येत आहे. पूजाने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत ती गावी असल्याचं सांगितलं.
पूजाने तिच्या गावचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गावची विहीर, पाठीमागे मस्त प्रशस्त घर दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने “माझं घर, माझं गाव, माझं कोकण”, असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओसोबत ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे गाणं सुद्धा ऐकू येत आहे. दरम्यान, सिद्धेश चव्हाणसोबत पूजा 2024मध्ये लग्नगाठ बांधणार आहे.
पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत तिने अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन क्षेत्रात पदापर्ण केलं. ‘दगडी चाळ’ ‘नीलकंठ मास्तर’, ‘सतरंगी रे’, ‘आता गं बया’सारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.