- सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी केले होते अपहरण
- शिरगाव येथे नदीपात्रात सापडला मृतदेह
पिंपरी – दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने शुक्रवारी (दि. 11) मध्यरात्री घरात झोपलेल्या तरुणाचे अपहरण केले होते. या तरुणाचा खून करून मृतदेह शिरगाव येथील नदीपात्रात टाकून दिला. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
सचिन उर्फ अंड्या लक्ष्मण चौधरी (वय 22, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. पुराबडी, राजस्थान) असे अपहरण करून खून केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील लक्ष्मण हुकमाराम चौधरी (वय 47) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी योगेश दिनेश सावंत (वय 22, रा. रुपीनगर), आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव (रा. चिंचेचा मळा, टॉवर लाईन रोड, तळवडे), रुपेश प्रकाश आखाडे (वय 23, रा. शिवरकर चौक, त्रिवेणीनगर) आणि अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी सचिन याचे अपहरण केले. त्यानंतर सचिन दिवसभर घरी आला नाही, त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत पोलिसात धाव घेऊन गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अपहरण केलेल्या सचिन चौधरी याचा खून करून मृतदेह शिरगाव येथील नदीपात्रात टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी शोधमोहीम राबविली असता त्यात सचिन याचा मृतदेह मिळून आला.
आरोपी आणि मयत हे सर्वजण पूर्वी एकत्र होते. त्यांनी एकत्रितरित्या गुन्हेही केले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मयत सचिन हा आरोपींपासून अलिप्त झाला होता. तसेच तो प्रतिस्पर्धी मुलांसोबत राहत होता. याचा आरोपींच्या मनात राग होता. तसेच पैशाच्या देवाण-घेवाणीतून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. इतर आरोपींना अटक केल्यानंतरच खुनाचा उलगडा हाईल, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आरोपी, मयत रेकॉर्डवरील गुन्हेगार
आरोपी योगेश सावंत याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात मारामारी, खुनाचा प्रयत्न असे पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश भालेराव याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारीचे चार गुन्हे दाखल आहेत. आरोपी रुपेश आखाडे याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात दरोडा आणि मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी यांचा मुलगा सचिन चौधरी याच्यावर देखील निगडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारीचे चार आणि चिखली पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक असे पाच गुन्हे दाखल आहेत. दरोड्याच्या एका गुन्ह्यात सचिन चौधरी आणि रुपेश आखाडे एकत्र होते.