जळगाव – शेतजमिनीच्या वादातून पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु येथील माजी सरपंचावर आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी (दि.9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
माजी सरपंच मधुकर दौलत पाटील (वय-57 रा. तारखेडा खु, ता. पाचोरा), त्यांचा भाऊ चैत्राम दौलत पाटील, पुतण्या रोशन चैत्राम पाटील अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी दशरथ रघुनाथ पाटील, राजेंद्र दशरथ पाटील, जयेश दशरथ पाटील, दिपक बाळकृष्ण पाटील (सर्व रा. तारखेडा खु. ता.पाचोरा) आणि चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मधुकर पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, आरोपी दशरथ पाटील आणि फिर्यादी मधुकर पाटील यांच्यामध्ये शेतजमिनीवरुन वाद आहेत. घटनेच्या दिवशी िमधुकर पाटील हे मजुरांनी काढलेल्या कपाशीचे वजन करण्यासाठी शेतामध्ये गेले होते. त्यावेळी दशरथ पाटील याने शिविगाळ करण्यास सुरुवात केली. याचा जाब विचारण्यासाठी ते गेले असता दशरथ पाटील याने आपल्या मुलांना आणी इतर चौघांना बोलावून घेतले.
यानंतर मधुकर पाटील यांच्यावर काठीने आणि लोखंडी सळईने हल्ला चढवला. आरोपींनी मधुकर पाटील यांच्यासह त्यांचा भाऊ आणि पुतण्याला बेदम मारहाण केली. तसेच दशरथ पाटील याने मधुकर पाटील यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा ऐकून मुख्य रस्त्याने इतर शेतकरी येण्याची चाहूल लागताच आरोपी पसार झाले.
गावातील लोकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत मधुकर पाटील यांच्या डोक्यावर सळईने वार झाला असून नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. याप्रकरणाचा तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल श्री. मालचे करत आहेत.