Municipal Corporation Election: 70 उमेदवार ‘बिनविरोध’ विजयावर राज ठाकरेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले- “अशी निवडणूक…”

Municipal Corporation Election 2026 : महाराष्ट्रातील २९ महापालिकांची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील विविध महापालिकांमध्ये तब्बल ७० उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली असून, यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मोठी बाजी मारली आहे. या अभूतपूर्व घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अशी निवडणूक कधीच पाहिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी या बिनविरोध प्रक्रियेवर आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, मी माझ्या उभ्या आयुष्यात आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करताना अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची परिस्थिती मी पहिल्यांदाच अनुभवतोय.
कोणत्या पक्षाचे किती बिनविरोध –
या बिनविरोध निवडींच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सत्ताधारी महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. यामध्ये भाजपाने सर्वाधिक ४४ जागांवर विजय मिळवला असून, त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार, मालेगावमधून इस्लाम पार्टीचा १ आणि एका अपक्ष उमेदवाराचा यात समावेश आहे. विशेषतः कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाने १५ तर शिवसेनेने ७ जागा जिंकून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
दरम्यान, या बिनविरोध निवडींमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील सर्व बिनविरोध निवडींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विरोधी उमेदवारांवर दबाव टाकणे, आमिष दाखवणे किंवा जबरदस्तीने नामनिर्देशन पत्र मागे घेण्यास भाग पाडणे असे प्रकार घडले आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. या चौकशीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. ७० जागांचा निकाल आधीच समोर आल्याने आता उर्वरित जागांसाठी होणारी लढत अधिक चुरशीची ठरणार आहे.





