मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीने आज दादर येथील शिवसेना भवनात संयुक्त जाहीरनामा जाहीर केला. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उपस्थित राहून मुंबईकरांसाठी अनेक आकर्षक घोषणा केल्या. हा जाहीरनामा ‘मुंबईचा स्वाभिमान’ आणि ‘मराठी माणसाच्या हितासाठी’ केंद्रित असल्याचं त्यांनी म्हटले आहे. मुख्य घोषणा कोणत्या? घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी : नोंदणीकृत घरगुती कामगार महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर, निवडणुकीनंतर सत्ता आल्यास अमलात आणणार.) कोळी महिलांसाठी विशेष योजना : माँ साहेब किचनद्वारे १० रुपयात जेवण उपलब्ध करून देणार. प्रॉपर्टी टॅक्स माफी : ७०० स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ. तरुण-तरुणींसाठी स्वयंरोजगार : २५,००० ते १ लाख रुपयांपर्यंत सहाय्यता निधी देऊन स्वयंरोजगाराला प्रोत्साहन. शिक्षण क्षेत्र : BMC शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज सुरू करणार, सर्व बोर्डांच्या शाळा उभारणार (मराठी भाषा अनिवार्य). पार्किंग आणि फुटपाथ : BMC पार्किंग मोफत, प्रत्येक फ्लॅटला एक पार्किंग हक्क, फुटपाथ आणि मोकळ्या जागा नागरिकांसाठी मोकळ्या करणार. वीज आणि पाणी : १०० युनिटपर्यंत वीज मोफत, BESTद्वारे पूर्व-पश्चिम उपनगरात वीज पुरवठा सुधारणा, पाण्याचे दर स्थिर. इतर प्रमुख घोषणा : प्रत्येक वार्डमध्ये मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शौचालय, एक नवीन कॅन्सर रुग्णालय (अर्ली डिटेक्शनसाठी), क्लायमेट ऍक्शन प्लॅन, BPT १८०० एकर जागा परत मिळवण्यासाठी कोर्ट लढा, BEST बस तिकीट दर कमी करून ५-२० रुपयांपर्यंत फ्लॅट रेट. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीनंतर आदित्य आणि अमित ठाकरे हे जाहीरनाम्याचे मुख्य चेहरा आहेत. अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना “तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो” अशी साद घातली. युतीत शिवसेना (UBT) १६०-१७५ जागा, MNS ५०-७० जागा आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) काही जागा लढवणार असल्याचे संकेत आहेत. आमच्याकडे निष्ठा, त्यांच्याकडे धनशक्ती : आदित्य ठाकरे यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “मुंबईत आता शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे उत्तम समीकरण जुळले आहे. आपल्याकडे निष्ठा आणि जनशक्ती आहे, तर समोरच्यांकडे फक्त ‘धनशक्ती’ आहे. अमित ठाकरेंचा भाजपला नाव न घेता टोला अमित ठाकरे यांनी आपल्या भाषणात अत्यंत संयमी पण धारदार शब्दात विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “आपल्या युतीत कोणी कोणाचे कार्यालय फोडले नाही, कुणी कोणाचे ‘एबी फॉर्म’ पळवले नाहीत की शिवीगाळ केली नाही. सर्वांनी सामंजस्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला, हीच खरी निष्ठा आहे. हाच फरक आमच्यात आणि त्यांच्यात आहे.”