Harshvardhan Sapkal : “स्वतःची शेती, वाडा किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प उभारलेला नाही”; सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात
Harshvardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना १८ तासात मिसिंग लिंक पुन्हा सुरू झाला असे म्हणत विरोधकांचं 'थोबाडं बंद झालं' या शब्दाचा वापर केला. यामुळे आता राजकारण चांगलंच तापलं आहे.

Harshvardhan Sapkal : ‘मिसिंग लिंक’वर सुरू झालेला वाद आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर दरड कोसळण्याची घटना घडली होती. या घटनेमुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी जोरदार टीका केली. काँग्रेसने देखील या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. इन्फ्रामॅन नाही डिझास्टर मॅन असे सपकाळ म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेत थेट विधानसभेत नाव न घेत सुनावलं.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना १८ तासात मिसिंग लिंक पुन्हा सुरू झाला असे म्हणत विरोधकांचं ‘थोबाडं बंद झालं’ या शब्दाचा वापर केला. यामुळे आता राजकारण चांगलंच तापलं आहे.
मिसिंग लिंकबाबत झालेल्या टीकेमुळे मुख्यमंत्री संतापले असून सभागृहात विरोधकांवर त्यांनी केलेली टीका ही त्यांच्या अहंकारी वृत्तीचे दर्शन घडवणारी असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळांची फडणवीसांवर घणाघाती टीका
शुक्रवारी बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, “मुख्यमंत्री नेहमी ‘मिसिंग लिंक मी बांधली’ असे सांगतात. मात्र, त्यांनी स्वतःची शेती, वाडा किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प उभारलेला नाही. सरकारी निधीतून झालेल्या कामाचे संपूर्ण श्रेय स्वतःकडे घेण्याचा हा अतिरेक असून एवढा ‘मीपणा’ आणि अहंकार योग्य नाही.”
ज्ञान आमच्याकडेच आहे आणि इतर सर्वजण अज्ञानी : हर्षवर्धन सपकाळ
मिसिंग लिंकबाबत केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, “ज्याला काही समजत नाही, अक्कल नाही, त्याच्यावर काय बोलायचे.” यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, ही भाषा देखील मुख्यमंत्रीपदाला साजेशी नाही. “सगळे ज्ञान आमच्याकडेच आहे आणि इतर सर्वजण अज्ञानी आहेत, अशी मानसिकता त्यांच्या वक्तव्यांतून दिसते. विरोधक संपतील, आम्हीच राहू, अशी भाषा त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे,” असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
हेही वाचा : Interrupted power supply : खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
‘भाडे के तट्टू’सारखी भाषा वापरणे निषेधार्ह
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधकांविषयी वापरलेले ‘थोबाड’, ‘कुत्रा’ यांसारखे शब्दही आक्षेपार्ह असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर राज्यभरातून या प्रकल्पावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगत सपकाळ म्हणाले, “विरोधक म्हणून आम्ही केवळ घटनात्मक पद्धतीने प्रश्न विचारत आहोत. त्यावर ‘भाडे के तट्टू’सारखी भाषा वापरणे निषेधार्ह आहे. मिसिंग लिंकमध्ये त्रुटी आढळल्यास महाराष्ट्राची बदनामी होते, एखाद्या व्यक्तीची नाही.”
अंजली दमानिया संतापल्या
अहंकार……फक्त आणि फक्त अहंकार मिसिंग लिंक ची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असतांना, सगळ्यांना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का एक मुख्यमंत्र्यांना ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला आहे.
प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये अफाट भ्रष्टाचार होत असतांना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देखलुंगा ‘ ? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे. आता म्हणतात ‘देखलुंगा ‘असे म्हणत दमानिया यांनी संताप व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय? राऊतांचा सवाल
खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. वैफल्य अहंकार माज वैगरे वैगरे… हे सर्व क्षणात उतरेल! महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे! पण काय करणार? खाण तशी माती! देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय? सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार, झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे! अशा शब्दांत संजय राऊत यांनी एक्सवरुन पोस्ट शेअर केली.
हेही वाचा : Kamshet : पर्यटकांकडून खंडणी प्रकरणी आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी





