Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या तोंडावर पालिकेची कोंडी!
Pune Grand Tour : १३६ किलोमीटरच्या रस्त्यावर १२९ किलोमीटर खोदाईचे प्रस्ताव

पुणे – पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी शहरातील रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली असतानाच, याच मार्गावर विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी तब्बल १२९ किलोमीटर लांबीच्या खोदाईचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.
स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते चकाचक करण्याचे नियोजन सुरू असताना दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खोदाईची मागणी झाल्याने प्रशासनासमोर रस्त्यांची कामे आणि सेवा वाहिन्यांचे नियोजन यांचा समन्वय साधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी महापालिका हद्दीतील सुमारे १३६ किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात येणार आहे.
यापैकी ५७ किलोमीटरचे रस्ते मागील वर्षी तयार करण्यात आले असून, उर्वरित ८७ किलोमीटरच्या रस्त्यांवर नव्याने कामे केली जाणार आहेत. या मार्गावरील रस्ते आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असणार आहे. मात्र, आता जवळपास ९५ टक्के मार्गावर खोदाईची परवानगी मागण्यात आली असल्याने महापालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच शहर अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संबंधित विभाग आणि सेवा वाहिन्यांच्या आस्थापनांना खोदाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्य चौकांमधील रस्ते ओलांडून जाणाऱ्या वाहिन्यांची कामे शनिवार-रविवारी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून करण्याचे ठरविण्यात आले आहे. महापालिकेच्या निर्धारित कार्यपद्धतीनुसार ही कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावाही पथ विभागाकडून केला जात आहे.
या ठिकाणांसाठी मागितली परवानगी
स्पर्धेच्या मार्गावर बाणेर परिसरात महावितरणकडून वीजवाहिन्या टाकण्यासाठी सात किलोमीटर, तर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) गॅसवाहिनीसाठी दोन किलोमीटर रस्त्याच्या खोदाईची परवानगी मागण्यात आली आहे.
याशिवाय, पोलिसांच्या सीसीटीव्ही यंत्रणेसाठी अलाईड कंपनीने सुमारे ८० किलोमीटर, तर महापालिकेच्या एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसी) प्रकल्पासाठी दिनेश इंजिनिअरिंग कंपनीने ४० किलोमीटर रस्त्याच्या खोदाईची परवानगी मागितली आहे.
या चार प्रस्तावांमधून एकूण १२९ किलोमीटर खोदाईची मागणी करण्यात आली आहे. २६ ते ३१ जानेवारीदरम्यान स्पर्धा होणार असल्याने रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून ते सुस्थितीत ठेवणे महापालिकेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
‘रस्ता नव्याने केल्यानंतर तो सेवा वाहिन्यांसाठी खोदला जातो. त्यामुळे, काही दिवसांपूर्वी खोदाईशी संबधित विभागांची बैठक घेतली होती. आता पर्यंत १२९ किलोमीटरच्या खोदाईचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यांना परवानगी दिली जाणार आहे. अन्यथा स्पर्धा झाल्यावर ते रस्ते खोदावे लागतील. त्यामुळे, ३१ आॅक्टोबर पूर्वी काम करण्याचे बंधन घालून या परवानग्या दिल्या जातील.’ – राजेश बनकर ( पथ विभाग प्रमुख)





