Pune: सर्वपित्री अमावस्येला बेवारसांच्या अस्थींचे विसर्जन
Pune:

Pune: राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महापालिकेच्या वतीने सर्वपित्री अमावस्येनिमित्त माणुसकीच्या भावनेतून ८२ बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून नदीत विसर्जन करण्यात आले.
राष्ट्रीय कला अकादमी आणि महापालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे १६ वे वर्ष आहे. हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार बेवारस मृतांच्या अस्थींचे पूजन करून त्यांचे विसर्जन केले जाते, असे मंदार रांजेकर आणि सदाशिव कुंदेन यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाट येथे हा विधी झाला. अपघात किंवा अन्य कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्या काही व्यक्तींची ओळख पटत नाही, अशा मृतांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी त्यांचे नातेवाईक उपलब्ध नसतात. त्यामुळे हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.
या वेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, नगरसेवक राजेंद्र काकडे, लता राजगुरू, डॉ. मिलिंद भोई, संजय मयेकर, बाला शुक्ला, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनीही या उपक्रमात सहभाग घेतला.





