Pune : पुण्यात एमपीएससी आंदोलनावर ड्रोन उडवला; युवक काँग्रेस अध्यक्षांसह 5 जणांवर गुन्हा
Pune : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल.

Pune : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी एस. एम. जोशी पुलाजवळ घडली.
आंदोलनाच्या ठिकाणी ड्रोन उडत असल्याचे गुप्तवार्ता विभागातील पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर ड्रोन चालवणाऱ्या दिगंबर खरे याचा शोध घेण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, खरे याने मोरे यांच्या सांगण्यावरून आंदोलनाचे चित्रीकरण करत असल्याचे सांगितले. त्याच्याकडे ड्रोन उडवण्यासाठी आवश्यक परवानगी किंवा परवाना नव्हता.
पोलिसांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे ड्रोन व इतर उपकरणे जप्त केली आहेत. शिवराज मोरे, दिगंबर खरे, प्रमोद पाटील, ऋषिकेश गंगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात जाऊन, माझ्याविरोधातही गुन्हा दाखल करा, असे आव्हान पोलिसांना दिले.





