Drone: आंदोलनस्थळी ड्रोन उडविल्याप्रकरणी गुन्हा
Drone:

आंदोलकांविरुद्ध दुसरा गुन्हा ; विनापरवानगी चित्रीकरण
Drone: एस.एम. जोशी पुलावरील आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाशी संबंधित दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी १ ऑक्टोबरपासून एस. एम. जोशी पुलावर आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती दिल्यानंतर नवी पेठेतील लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावर बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी शुक्रवारी एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींसह १५ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शनिवारी ड्रोन उडविल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस हवालदार युवराज भारत टोळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिगंबर भारत खारे (रा. तुकाराम हाइट्स, तुकारामनगर, गायमुख, आंबेगाव), प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गागुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरला सायंकाळी ७:३०च्या सुमारास पोलीस हवालदार टोळे हे एस.एम. जोशी पुलावर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आंदोलनस्थळी ड्रोन उडताना दिसला. टोळे यांनी शोध घेतला असता, आंदोलनाच्या मागील बाजूस जनरेटरजवळ दिगंबर खारे रिमोट कंट्रोलरच्या साहाय्याने ड्रोन चालवत असल्याचे आढळले.
खारेकडे ड्रोन उडवून चित्रीकरण करण्यासाठी आवश्यक परवाना आणि स्थानिक पोलीस विभागाची परवानगी आहे का, अशी विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले. चौकशीदरम्यान, आंदोलनात सहभागी असलेल्या प्रमोद पाटील आणि इतरांच्या सांगण्यावरून ड्रोन आणल्याचे त्याने सांगितले त्यानंतर पोलिसांनी ड्रोन जप्त केला. विश्रामबाग पोलिस पुढील तपास करीत आहेत.





