Dengue: १६ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत दीड हजार डेंग्युचे रुग्ण
Dengue:

संपूर्ण शहरात प्रादूर्भाव वाढला
Dengue: पुणे शहरात डेंग्युचा प्रादूर्भाव वाढला आहे. पाऊस आणि ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे जूनपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत शहरातील १६ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण १ हजार ६४३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोथरूड, नगररोड-वडगावशेरी आणि औंध-बाणेर परिसरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाने केलेल्या डेंग्यूच्या आयजीएम आणि एनएस-१ एलिसा चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार जूनमध्ये १०३, जुलैमध्ये ३६६, ऑगस्टमध्ये ५१२, तर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ६६२ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. जूनच्या तुलनेत सप्टेंबरमधील रुग्णसंख्या सहापटीने अधिक आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय आकडेवारीत कोथरूडमध्ये सर्वाधिक २२९ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ नगररोड-वडगावशेरीमध्ये २२२, औंध-बाणेरमध्ये २१२, धानकवडी-सहकारनगरमध्ये १३९ आणि येरवडा-कळस-धानोरीमध्ये १३७ रुग्णांची नोंद झाली आहे.
सप्टेंबरमध्ये औंध-बाणेरमध्ये सर्वाधिक १०७ रुग्ण आढळले. नगररोड-वडगावशेरीमध्ये ८३, कोथरूडमध्ये ८०, येरवडा-कळस-धानोरीमध्ये ६० आणि धानकवडी-सहकारनगरमध्ये ५४ रुग्ण आढळले.
केशवनगरमध्येही रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, सप्टेंबरमध्ये ४९ रुग्ण आढळले. ऑगस्टमध्ये ही संख्या ११ होती. हडपसर-मांजरीमध्ये सप्टेंबरमध्ये ३८ रुग्णांची नोंद झाली.





