बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 2 ते 12 जानेवारी, 2023 या कालावधीत पार पडणार आहे.राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन होत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव आणि क्रीडा आयुक्त सुहास दिवसे स्पर्धेच्या आयोजनावर लक्ष ठेवून आहेत.
या स्पर्धेत एकूण 39 खेळांचा समावेश आहे. यामध्ये बालेवाडी येथे 21 खेळांचे आयोजन होत आहे. नागपूर आणि जळगावात प्रत्येकी चार, नाशिकमध्ये दोन खेळांचे तर मुंबई, बारामती, अमरावती, औरंगाबाद, सांगली व पुणे परिसरात एमआयटी, विमाननगर व पूना क्लब येथे प्रत्येकी एक खेळ याप्रमाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वतंत्र क्रीडा धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील घडामोडीचा वेध घेत भविष्यात करावयाच्या कार्यप्रणालीसंबंधात राज्य शासनाने क्रीडा धोरण आखले असून, 2012 पासून त्याची अंमलबजावणी होत आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण योजना, उपक्रम राबवित असल्यामुळे अनेकांना क्रीडा क्षेत्रात कारकिर्द घडवण्याची संधी निर्माण होत आहे.
मिनी ऑलिम्पिक राज्यातील विविध भागातून ऑलिम्पिक स्पर्धेसह विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी दर्जेदार क्रीडापटू तयार व्हावेत, यासाठी मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन या स्पर्धेचे संयुक्त आयोजक आहेत.
या स्पर्धेत तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिमनॅस्टीक्स, हॅंडबॉल, हॉकी, ज्युडो (मुले व मुली), कबड्डी, खो-खो, लॉन टेनिस, मॉडर्न पेंटाथलॉन, शूटींग, रोविंग, रग्बी, स्वीमिंग-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वॉंदो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टींग, कुस्ती, वु-शू, सायकलिंग (रोड व ट्रॅक), नेटबॉल, सेपक-टकरा, स्कॉश, मल्लखांब, शूटींग बॉल, सॉफ्टबॉल, योगासने, सॉफ्ट टेनिस, रोलर स्केटींग, यॉटींग, गोल्फ आणि कॅनोइंग-कयाकिंग या क्रीडा प्रकारांचा, स्पर्धेत समावेश आहे.
सुमारे 7 हजार खेळाडूंसह, संघाचे व्यवस्थापक, प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी व पंच असे मिळून 10 हजार 456 जण स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी शासनाने 19 कोटी 7 लाख 94 हजारांचा निधी दिला आहे. ही स्पर्धा सर्वोच्च राज्यस्तरीय स्पर्धा असून ती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या धर्तीवर पार पडणार आहे. त्या-त्या खेळांतील राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील प्रथम आठ स्थानावर आलेल्या संघातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
क्रीडा ज्योत या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही ज्योत रायगड किल्ल्यावरून पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात पोहोचेल. तसेच आठ विभागीय मुख्यालय येथून क्रीडा ज्योतींचे पुणे येथे आगमन होणार असून, पुणे येथे क्रीडा ज्योतींची भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावरावरील खेळाडू निर्माण होतील. स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामुळे राज्यातून निश्चितच ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास आहे.
– जयंत कर्पे, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, पुणे