तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नगरपरिषद कार्यालय येथे नमस्ते उपक्रमांतर्गत मैला व्यवस्थापन व भुयारी गटार स्वच्छता करणा-या स्वच्छ्तादूत कर्मचा-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मार्गदर्शक शिबिर घेण्यात आले.
या वेळी सफाई कर्मचा-यांना त्यांचे राहणीमानाचा दर्जा वाढविणे, विविध विमा योजना, आरोग्य योजना, तसेच सफाई करण्यासाठी सरकारतर्फे देण्यात येणा-या सबसिडीबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत नियुक्त शहर समन्वयक गीतांजली होनमणे यांनी सर्व सफाई कर्मचाऱयांना स्वयं सुरक्षिततेची काळजी घेवून सफाईचे काम कसे करावे?, स्वयं संरक्षणात्मक साहित्याचा वापर का करावा?, सफाईसाठी वापरण्यात येणा-या विविध संसाधनांचा योग्य वापर करणेबाबत तसेच सफाईचे साधने व वाहने खरेदी करताना शासनातर्फे सफाई कर्मचारी यांना देण्यात येणा-या सबसिडीबाबत मार्गदर्शन केले.
नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजनासाठी नियुक्त असणा-या शहर अभियान व्यवस्थापक विभा वाणी यांनी उपस्थिताना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, तसेच बचत गट व इतर योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी अभिषेक शिंदे व स्वच्छता निरीक्षक मयूर मिसाळ यांच्यातर्फे उत्कृष्ठ महिला सफाई कर्मचारी यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.