Maval News: नायगावात लाखो रुपये गटारात जिरले? बंदिस्त गटारांच्या निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांचा संताप
Maval News: नायगाव बंदिस्त गटार बातमी, कान्हे ग्रामपंचायत सांडपाणी समस्या, नायगाव रस्ते सांडपाणी, मावळ तालुका बातम्या, कंत्राटदार निकृष्ट काम नायगाव, संतोष शिंदे ग्रामपंचायत अधिकारी

Maval News – नायगाव येथे लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या बंदिस्त गटारीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लाखो रुपये खर्च करुनही सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसून अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर येत आहे तर काही ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या चेंबरभोवतीची खडी, वाळू वाहून गेली आहे. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
गटारीच्या काही ठिकाणी चेंबर उंच, तर काही ठिकाणी खोल असल्याने पाणी चेंबरमध्ये जाण्याऐवजी थेट गटारीच्या बाजूने व रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे बंदिस्त गटार असूनही त्याचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी करण्यात आलेली पीसीसीदेखील निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गटारीच्या वर केलेले सिमेंट काँक्रिटीकरण खडी व वाळू वाहून जात असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच ठिकाणी वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली खर्च होत असल्याने हा खर्च नेमका ग्रामस्थांच्या सुविधेसाठी की ठेकेदारांच्या फायद्यासाठी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काम पूर्ण करण्यापूर्वी संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली होती का, तसेच कामाची गुणवत्ता तपासली होती का, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. गटारीचे काम पूर्ण करून सांडपाण्याचा योग्य निचरा होईल, यासाठी प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
“नायगावमधील बंदिस्त गटारीच्या कामाचा एक भाग पूर्ण झाला असून मारोती मंदिर परिसरातील काम टेंडर प्रक्रियेत होते ते लगेच करणार आहोत. पावसामुळे काम करणे थोडे अवघड झाले आहे. ज्या ठिकाणी चेंबर तुटलेले, उघडे आहेत. ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येतील. बाकीच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम देखील लवकरच हाती घेण्यात येणार आहे.”
– संतोष शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी, कान्हे




