Indrayani River Pollution – पुणे-मुंबई महामार्ग परिसरातील हॉटेल व्यवसायिक तसेच घरगुती सांडपाणी थेट नायगाव येथील ओढ्यात सोडले जाते. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ओढ्याचे पाणी पुढे जाऊन थेट इंद्रायणी नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणीही मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे.या भागात गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नायगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या सांडपाण्यामुळे ओढा पूर्णतः दूषित झाला असून परिसरात राहणे कठीण झाले आहे.नायगाव येथील ओढ्यात मांसाहार व्यवसायातून निघणारा कचरा आणि मृतदेह थेट टाकले जात असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून डास आणि माश्यांचा त्रास वाढला आहे. या दूषित पाण्याचा परिणाम परिसरातील शेतीवरही होत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतीसाठी वापरण्यात येणारे पाणी दूषित झाल्याने पिकांचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. नागरिकांनी व्यवसायिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “कामशेत आणि नायगाव परिसरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट ओढ्यात सोडले जात आहे. यामुळे शेतीसह आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.” – विकास लालगुडे, स्थानिक नागरिक