Shirur News : दुभाजक तोडल्याने शिरूर बायपासवर मृत्यूचा सापळा? किशोर यादव, प्रथमेश लाड यांच्या मृत्यूने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Shirur News : पुण्याकडून अहिल्यानगरकडे आणि अहिल्यानगरकडून पुण्याकडे भरधाव वाहतूक सुरू असताना वाहनचालकांनी अचानक ‘यू टर्न’ घेतल्यास मागून येणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शिरूर : शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील हॉटेल संग्रामसमोरील अनाधिकृत तोडलेल्या दुभाजकामुळे बुधवार दि. ११ रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात नामांवत उद्योजक व आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक किशोर नामदेव यादव (वय ३८, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) व प्रथमेश प्रकाश लाड (वय ३०, रा. सुंदर सृष्टी, शिरूर, मूळ रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे पारनेर, श्रीगोंदा,शिरूर तालुक्यात कार्यरत असलेल्या किशोर यादव यांचे निधन झाल्याने शोक व्यक्त होत आहे.
दुभाजक तोडल्यामुळे अनधिकृतपणे निर्माण झालेला मार्ग तातडीने बंद करून दुभाजक पूर्ववत न केल्यास आणखी किती जीव जाण्याची प्रशासन वाट पाहणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. हॉटेल संग्रामसमोरील दुभाजकाचा काही भाग तोडल्याने पुणे–अहिल्यानगर मार्गावर दोन्ही दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांना धोकादायक पद्धतीने ‘यू टर्न’ घेण्याची सोय निर्माण झाली आहे. या ठिकाणी नियमित वाहतुकीचा अधिकृत मार्ग नसतानाही अनेक वाहनचालक शॉर्टकट म्हणून या तुटलेल्या दुभाजकाचा वापर करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या मार्गात अचानक वळणारी वाहने येत असल्याने अपघाताचा धोका कायम आहे.
बुधवारी सायंकाळी याच ठिकाणी उद्योजक किशोर नामदेव यादव (वय ३८, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) यांच्या एन्डेवर मोटारीला मागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यानंतर एन्डेवर मोटार दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या प्रथमेश प्रकाश लाड (वय ३०, रा. सुंदर सृष्टी, शिरूर, मूळ रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांच्या दुचाकीवर आदळली. धडकेने एन्डेवर दुचाकीसह विरुद्ध दिशेला गेली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या शिवाई बसने या वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात किशोर यादव आणि प्रथमेश लाड यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “दुभाजक तोडला गेला, तेथे अनधिकृत ‘यू टर्न’ तयार झाला आणि त्यातून वाहनांची ये-जा सुरू राहिली. प्रशासनाने वेळीच हा धोका ओळखून दुभाजक पूर्ववत केला असता तर कदाचित हा अपघात टाळता आला असता,” अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. तुटलेल्या दुभाजकामुळे निर्माण झालेली वाहतुकीची धोकादायक परिस्थिती हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरला पाहिजे, अशी मागणी होत आहे.
हॉटेल संग्रामच्या वळणासाठी हे दुभाजक तोडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुभाजक तुटल्यामुळे या ठिकाणी अचानक रस्ता ओलांडणाऱ्या वळणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. पुण्याकडून अहिल्यानगरकडे आणि अहिल्यानगरकडून पुण्याकडे भरधाव वाहतूक सुरू असताना वाहनचालकांनी अचानक ‘यू टर्न’ घेतल्यास मागून येणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, महामार्गावरील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी दुभाजकाची रचना करण्यात आलेली असताना तो तुटल्यानंतर त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र, हा मार्ग सुरू राहिल्याने वाहनचालक त्याचा वापर करू लागले आणि आता दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाचे लक्ष या धोकादायक ठिकाणाकडे वेधले गेले आहे.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर हॉटेल संग्रामसमोरील तोडलेला दुभाजक कोणी तोडला त्याच्यावर कार्यवाही करावी.तुटलेला दुभाजक तातडीने पूर्ववत करावा. अनधिकृत ‘यू टर्न’ पूर्णपणे बंद करावा, तसेच वाहनांना सुरक्षित वळण घेण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अधिकृत मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याशिवाय या ठिकाणी दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, पुरेशी प्रकाशयोजना आणि आवश्यक असल्यास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशीही मागणी पुढे आली आहे.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने पुणे–अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
एका अपघातानंतर काही दिवस चर्चा होऊन पुन्हा त्याच ठिकाणी परिस्थिती जैसे थे राहण्यापेक्षा, या घटनेची गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तुटलेला दुभाजक नेमका कसा आणि कधी तुटला, त्यानंतर तो पूर्ववत का करण्यात आला नाही आणि या ठिकाणी अनधिकृत ‘यू टर्न’ सुरू राहण्यास जबाबदार कोण? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
किशोर यादव आणि प्रथमेश लाड यांच्या दुर्दैवी मृत्यूने शिरूर बायपासवरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता तरी प्रशासनाने अपघाताची वाट न पाहता हॉटेल संग्रामसमोरील तुटलेला दुभाजक पूर्ववत करून हा ‘मृत्यूचा यू टर्न’ कायमचा बंद करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.





