नायगाव, (वार्ताहर) – मी कॉलेज जीवनापासून शरद पवार यांच्यावर प्रेम करतो. पक्ष फुटेल अस कधी वाटले नाही. राजकारण कधी काय मिळेल, मिळणार नाही याची कधी पर्वा केली नाही. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही पण इतरही प्रश्न महत्वाचे आहेत. शासनाच्या अनेक योजनांमध्ये त्रुटी आहेत. त्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर दूर केल्या जातील, असे आश्वासान शिरूर-हवेलीचे पवार गटाचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी केले. नायगाव (ता. पुरंदर) येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे महाराष्ट्र राज्यातून भाविक येत असतात. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून याची प्रचिती अनेकांना आलेली आहे. यामध्ये आमदार अशोक पवार यांना सुद्धा याची प्रचिती आली आहे. त्यांनी अन्नदानाचा नवस केला होता तो पूर्ण करण्यासाठीसाठी ते नायगावला आले होते. हा योग सिद्धेश्वर सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रदीप खेसे यांनी घडवून आणला. यावेळी सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने आमदार अशोक पवार व परिवाराचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, पुणे जिल्हा पवार गताचे उपाध्यक्ष अनिल जगताप, हवेली तालुका अध्यक्ष जगदीश महाडिक, सुनील कोलते, योगेश शितोळे, भारतीय सहकारी बँकेचे अध्यक्ष भाऊसाहेब कड, नायगावचे सरपंच बारीकराव खेसे, उपसरपंच दत्तात्रय दरेकर, गणपत कड, बाळासाहेब कड, भारती चौंडकर, संजय होले, जयराम खेसे, दशरथ चौंडकर आदी उपस्थित होते. संतोष गायकवाड यांनी आभार मानले.