Weather Update : मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; ‘या’ जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला सुट्टी
Weather Update : पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम

Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या २९ जुलै रोजी रेड अलर्ट घोषित केला आहे तर २८ ते ३० जुलैदरम्यान नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.
संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आज बुधवार, २९ जुलै रोजी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व सरकारी व खासगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे.
याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, संभाव्य अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानाचा विचार करून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २९ जुलैला होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अचानक पूर येण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमुळे आणि मुसळधार पावसामुळे कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत.
दरम्यान, मंगळवारी (28 जुलै) नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, छत्रपती चौक, अशोक चौक, यशोधरानगर, शांतीनगर, बालाजीनगर, धरमपेठ, सुरेंद्रगड, आमदार निवास, पोलिस मुख्यालय, महाल, नारा आणि पारडी परिसरात पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
बुधवारी पूर्णपणे बंद
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, ही सुट्टी नागपूर शहरात (नागपूर महानगरपालिका क्षेत्रासह) आणि नागपूर ग्रामीण, हिंगणा व कामठी या लगतच्या तालुक्यांमध्ये लागू राहील. या भागांतील सर्व शासकीय आणि खाजगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बुधवारी पूर्णपणे बंद राहतील.
दुसरीकडे, 30 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणातून सध्या नदीपात्रात 4862 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना येलो अलर्ट’ जारी केला आहे.
पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम
दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. जून महिना कोरडा गेला असल तरीही जुलै महिन्यात राज्यभरात समाधानकारक पाऊस झाला आहे. यातच आता हवामान खात्याने मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा:
Pune District : वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची धडपड





