नाशिक – नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील महादेवाच्या दर्शनासाठी आज भाविकांची गर्दी होती. तर अधिक मास महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने गोदाकाठावर स्नान करण्यासाठी भाविकांची मांदियाळी केल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवस सलग सुट्ट्या आल्याने नाशिकच्या पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी झाली आहे.
विकेंड आणि त्यानंतर आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर, सप्तशृंगी गड, ईगतपुरी हा परिसर भविकांसह पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. तसेच भाविकांनी रामकुंडावर हजारोंच्या संख्येने हजेरी लावल्याने गोदकाठ दिसेनासा झाला आहे. आज अधिक श्रावण अमावस्या असून उद्या निज श्रावण मासाला सुरुवात होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर देखिल या स्नानाला विशेष महत्व मानले जाते.
तब्बल 12 वर्षानंतर अधिक मास आणि श्रावण मास एकत्र आल्याने पवित्र स्नानासाठी गोदाकाठावर भाविकांची मोठ्या संख्येने येथे हजेरी लावली. ही अमावस्या दर तीन वर्षांनी एकदा येते. अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्नान, दान करण्याला महत्व असल्याचे सांगितले म्हणूनच नाशिकच्या रामकुंडांवर गर्दी पाहायला मिळाली.