नाशिक – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नाशिकमधून करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदावरीची आरती करण्यात आली.
सोमवारी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात आली.
त्यानंतर उद्धव ठाकरे हे नाशिक येथील रामकुंड परिसरात दाखल झाले. त्यांनी रामकुंडावर गोदावरीची आरती केली. यावेळी उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी कडेकोट नियोजन केले होते. उद्धव ठाकरे रामकुंडावर दाखल होताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदाकाठावर ठाकरे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.
गोदाकाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे अनेक बॅनर्स लावल्याचे यावेळी दिसून आले. श्रीराम जन्मभूमी अयोध्याच्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने श्री प्रभू रामचंद्र अभिषेक पूजा, सामूहिक रामरक्षा पठण व प्राणप्रतिष्ठा मंत्रघोष गोदाकाठी करण्यात आले. देशभरामध्ये प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने उत्साह आहे. त्यात नाशिकमध्ये देखील असाच उत्साह पाहायला मिळाला.
बाळासाहेबांची आली आठवण
उद्धव ठाकरे यांनी नाशिका दौऱ्यावर भगवा कुर्ता परिधान केला होता. यावेळी त्यांनी माथ्यावर भगवा टीळा आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. उद्धव ठाकरे यांना अशा लुकमध्ये पाहिल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित लोकांना बाळासाहेबांची आठवण नक्कीच आली असणार आहे.