निघोज -राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या निघोज येथील मळगंगा देवीचा मुख्य यात्रोत्सव गुरुवार दि. 13 पासून सुरू होत आहे. त्यादृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुधवारी मळगंगा देवीला हळद लावून यात्रा उत्सवाची सुरुवात करण्यात आली. गुरुवारी पारी चार वाजता मळगंगा देवीच्या 85 फूट उंचीच्या सजवलेल्या काठीची मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली. यावेळी देवीच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर निनादून गेला होता.
मळगंगा देवीची हेमाडपंथी बारव, संदीप पाटील चौक, ग्रामपंचायत चौक, तसेच जुनी पेठ ते मळगंगा मंदिर अशाप्रकारे ही मिरवणूक काढण्यात आली. तब्बल दोन तास ही मिरवणूक सुरू होती. मळगंगा मंदिराजवळ ही काठी उभी करण्यात आली. बुधवारी देवीच्या हळदीची मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली. यावेळी हजारो महिला उपस्थित होत्या. देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीला हळद लावत हळद खेळण्याचा आनंद घेतला.
मळगंगा देवी हे जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध असून यात्रा उत्सवासाठी लाखो भावीक मोठ्या संख्येने उपस्थित राहात असतात. यात्रेचा मुख्य यात्रा उत्सव गुरुवारी दि.13 दुपारी बगाड गाडा मिरवणूक, देवीला अंबील वर्तविणे, त्यानंतर लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन. रात्री नऊ वाजता देवीच्या छबिण्याची मिरवणूक, रात्री 11 वाजता देवीच्या हेमाडपंथी बारवेमध्ये घागर दर्शन, दि. 14 रोजी सकाळी 7 वाजता घागरीची मिरवणूक, त्यानंतर दुपारी तीन वाजता पालखीची मिरवणूक कुंडावर जाते. त्यानंतर कुंडावरील यात्रा सुरू होते.
दि. 15 रोजी कुंडावर दुपारी चार वाजता कुस्ती हगामा सुरू होतो. अशाप्रकारे तब्बल चार दिवस ही यात्रा संपन्न होत आहे. मळगंगा देवीचे पुजारी गायखे बंधू शेकडो वर्षांपासून देवीची पुजा करीत आहेत. घागरीचा मिरवणूक मान गायखे कुटुंबाला आहे. ग्रामपंचायत, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज व मुंबईकर मंडळ या यात्रेचे नियोजन करीत असतात.