Mahaganapati Temple: महागणपती भाविकांसाठी पुन्हा खुला! संवर्धनानंतर मंदिराचे नयनरम्य रूप; फुलांची आकर्षक सजावट
Mahaganapati Temple: देवस्थान ट्रस्टच्या वतीने गणेशयाग, महापूजा व महानैवेद्य सोहळा संपन्न; रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने गाभारा अन् मंदिर परिसर उजळला.

Mahaganapati Temple – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून केलेल्या जतन व संवर्धनाच्या कामांनंतर शनिवार (दि.१) रोजी पहाटे मंदिर पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. नव्याने संवर्धित झालेल्या मंदिराचे देखणे रूप आणि फुलांची आकर्षक सजावट पाहून भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मंदिरातील जतन व संवर्धनाच्या कामासाठी १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. नियोजित कामे पूर्ण झाल्यानंतर दि. १ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. पहाटे ५ वाजता देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर-पाटील आणि चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर-पाटील यांच्या हस्ते श्री महागणपतींचा अभिषेक करण्यात आला.
यावेळी त्यांच्या हस्ते १००१ नारळांचे तोरण श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले. सकाळी ७.३० ते १० या वेळेत देवस्थान ट्रस्टचे खजिनदार . विजय देव यांच्या हस्ते गणेशयाग विधी संपन्न झाला. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनरांग व्यवस्थेची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे भाविकांना सुरळीत व शिस्तबद्ध दर्शन घेता आले.
दुपारी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्याचा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर आणि गाभाऱ्याला विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजावट केली होती. नव्याने संवर्धित मंदिराचे भव्य आणि नयनरम्य रूप पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले.
“जतन व संवर्धनाच्या कामामुळे श्री महागणपती मंदिराचे रूप अधिक देखणे झाले असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा देवस्थान ट्रस्टचा प्रयत्न आहे.”
– स्वाती पाचुंदकर-पाटील, अध्यक्षा, देवस्थान ट्रस्ट.





