Amit Shah: ‘टिळकांचे विचार राष्ट्रहितासाठी प्रेरणादायी!’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे प्रतिपादन
Amit Shah: पुण्याशी असलेले जुने नाते आणि चतुःशृंगी मंदिराच्या आठवणींना डोवाल यांनी दिला उजाळा; राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती.

Amit Shah – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा मजबूत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांच्या सल्ल्याचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. लोकमान्य टिळक यांचे विचार आजही राष्ट्रनिर्मितीसाठी मार्गदर्शक असून डोवाल यांना दिलेला पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्याचे शहा यांनी नमूद केले.
टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा अजित डोवाल यांना प्रदान केला. महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात शहा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक आदी उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून टिळकांनी सांस्कृतिक राष्ट्रवाद रुजवल्याचे सांगून शहा म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप देत त्यांनी केसरी आणि द मराठा वृत्तपत्रांद्वारे निर्भीड पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला.

लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड २०२६ भारतीय राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात आला.
राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून देशभक्त नागरिक घडविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. डोवाल यांच्यामुळे अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाबरोबर देशातील १३ बॉम्बस्फोटांची उकल करण्यात डोवाल यांनी महत्त्वाचे काम केले. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण अधिक मजबूत करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोवाल यांची निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव असल्याचे सांगितले.
त्यांच्या प्रोॲक्टिव्ह डिटरन्सच्या संकल्पनेमुळे देशाची सुरक्षा रणनीती प्रभावी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यात डोवाल यांचे योगदान अतुलनीय असल्याचे नमूद केले, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा पुरस्कार राष्ट्रसुरक्षेचा सन्मान असल्याचे म्हटले. ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या डोवाल यांचा गौरव करताना अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.
पुण्यातील आठवणींना उजाळा
अजित डोवाल यांनी पुण्यातील आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनाची सुरुवात पुण्यातूनच झाल्याचे सांगताना दीड वर्ष येथे राहिल्याचे सांगितले. या वेळी प्रत्येक मंगळवारी चतुःशृंगी मंदिरात आईसोबत जायचो. शाळेत प्रार्थनेनंतर एका वरिष्ठ शिक्षकाने लोकमान्य टिळकांबद्दल सांगितले होते. इतक्या वर्षांनंतर मला याच शहरात टिळकांच्या नावाने पुरस्कार दिला जाईल, असा विचार मी कधीही केला नव्हता, असे डोवाल म्हणाले.





