Pune District : १ ऑगस्टपासून श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले
Pune District : देवस्थान ट्रस्टने ग्रामस्थ व भाविकांना मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, दर्शनासाठी येताना शिस्त व नियमांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

रांजणगाव गणपती : ३१ अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिराचे दरवाजे तब्बल साडेतीन महिन्यांनंतर शुक्रवार, १ ऑगस्ट २०२६ पासून पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहेत. पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून मंदिराच्या जतन, संवर्धन व विकासाची कामे हाती घेण्यात आल्याने १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, निश्चित करण्यात आलेली विकासकामे पूर्णत्वास येत असून १ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले होणार आहे. पुढील काही काळ मंदिर परिसरात विकासकामे सुरू राहणार असली, तरी भाविकांच्या दर्शन व्यवस्थेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसून सर्वांना सुरळीतपणे श्रींचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
देवस्थान ट्रस्टने ग्रामस्थ व भाविकांना मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, दर्शनासाठी येताना शिस्त व नियमांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
१ ऑगस्ट २०२६ रोजीचा दैनंदिन कार्यक्रम
– पहाटे ५.०० ते ५.३० – श्रींचा अभिषेक
– पहाटे ५.३० – मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले
– सकाळी ७.३० – सामूहिक आरती
– सकाळी ७.३० ते १०.०० – गणेश याग
– दुपारी १२.०० – महापूजा
– सायंकाळी ७.३० – सामूहिक आरती
– रात्री ९.४५ – शेजारती
यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार . विजय देव, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके तसेच देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.





