Wall Collapse: भारती हॉस्पिटलची सीमाभिंत कोसळली! तब्बल ५० दुचाकी मलब्याखाली गाडल्या, मोठे नुकसान
Wall Collapse: भिंतीलगत पार्क केलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकींवर पडला झाडे अन् दगडांचा मलबा; जेसीबीच्या साहाय्याने गाड्या बाहेर काढण्याची कसरत.

Wall Collapse – कात्रज येथील भारती हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीलगत असलेली दगडी सीमाभिंत शनिवारी सकाळी कोसळली. भिंतीशेजारी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पार्क केलेल्या ५० दुचाकींवर भिंतीचा मलबा कोसळल्याने वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मलबा हटवून दुचाकी बाहेर काढण्याचे काम हाती घेतले.
सायंकाळी उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते. भारती हॉस्पिटलची ही भिंत २० फूट उंच, १०० फूट लांब होती. भिंतीवर मोठमोठी झाडे वाढली असून त्यांचेही भिंतीवर वजन होते. दोन दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू असल्याने जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी मुरले होते. परिणामी, जुनी दगडी भिंत ठिसूळ झाली असण्याची शक्यता आहे.शनिवारी सकाळी साडेदहाला सीमाभिंत कोसळली.
भिंतीलगत हॉस्पिटलमधील कर्मचारी दुचाकी पार्क करतात. या दुचाकी भिंतीखाली गाडल्या गेल्या. दगड, माती आणि झाडांचा मोठा मलबा दुचाकींवर पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळ दाटीवाटीचे असल्याने मलबा हटविताना अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. एका जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू होते.
त्यामुळे दुचाकी बाहेर काढण्याच्या काम संथ गतीने सुरु होते .सायंकाळी सहा वाजेपर्यंत २५ ते २७ दुचाकी मलब्यातून बाहेर काढल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान आणि संबंधित कर्मचारी मलबा हटवून दुचाकी बाहेर काढत होते. भिंत कोसळली त्यावेळी या परिसरात नागरिकांची वर्दळ नव्हती. भिंतीलगत पार्क केलेल्या दुचाकींवर कोणीही बसलेले नव्हते.सर्व दुचाकी बाहेर काढल्यानंतर नेमके किती नुकसान झाले, हे स्पष्ट होणार आहे.





