Queen Elizabeth Funeral : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांचं पार्थिव लंडनमधील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील उपस्थित राहणार आहेत.
रात्री 12 वाजता शाही कुटुंब महाराणीला कायमचा निरोप देईल आणि महाराणी एलिझाबेथ यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारील समाधीमध्ये दफन करण्यात येईल.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, फर्स्ट लेडी जिल बायडेन, न्यूझिलंडच्या पंतप्रदान जेसिंडा आर्डन, युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्सकी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस,कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे अंत्यसंस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले.
सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले होते. पण ते कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले. सीरिया, व्हेनेझुएला, अफगाणिस्तान या देशांच्या प्रतिनिधींना अंत्यसंस्कार सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नव्हते. रशिया, बेलारुस आणि म्यानमार या देशांनाही निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून युके आणि रशिया यांच्यातले संबंध दुरावले आहेत.