लंडन – ब्रिटनमध्ये राजघराण्याचे वंशज आणि दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स तिसरे यांना ब्रिटनचे राजे म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज झालेल्या राज्यरोहणाच्या समारंभामध्ये चार्ल्स यांनी आपल्या आईचे अर्थात एलिझाबेथ द्वितीय यांचे प्रेरणादायी उदाहरण अनुसरण्याची कटिबद्धता व्यक्त केली. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये झालेल्या या राज्यारोहणाच्या समारंभाचे टिव्हीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.
राज्यारोहणानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणामध्ये चार्ल्स यांनी सर्वप्रथम महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाची माहिती दिली. महाराणी एलिझाबेथ यांचे जीवनकार्य म्हणजे प्रेम आणि निस्वार्थ सेवेचे उदाहरण होते. त्यांचा राज्यकारभार म्हणजे तुलना करता न येऊ शकेल असे त्याग आणि भक्तीचे उदाहरण आहे. त्यांच्या निधनाचे जरी आपल्याला दुःख झाले असले, तरी त्यांच्या विश्वासू जीवनाबद्दल आपण त्यांना धन्यवादच देत असल्याचे चार्ल्स यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
ब्रिटनचे राजे म्हणून आपण संघराज्याच्या सरकारला अबाधित राखण्यास आणि जगभरातील राष्ट्रकुलाशी संबंधित क्षेत्रांमध्ये शांतता, सौहार्द आणि समृद्धताही कायम राखू, अशी हमी चार्ल्स यांनी आपल्या भाषणात दिली. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. त्यानंतर प्रिन्स ऑफ वेल्स अर्थात युवराज चार्ल्स हे राजेपद स्विकारतील असे घोषितच करण्यात आले होते. आजच्या राज्यारोहण सोहण्यात त्या घोषणेची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
राजपदाच्या निवडीसाठीच्या राजकीय नेते, धर्मोपदेशक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या समितीची औपचारिक बैठक झाली. त्यामध्ये चार्ल्स यांच्या राज्यारोहणाच्या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. शुक्रवारी चार्ल्स यांच्या निवडीची औपचारिक घोषणा झाल्यावर चार्ल्स यांनी पंतप्रधान लिझ ट्रस यांची भेट घेतली.
देशभरातील प्रमुख नेत्यांनीही चार्ल्स यांची भेट घूेन त्यांचे अभिनंदन केले होते. सेंट जेम्स राजवाड्याच्या गॅलरीतून सामान्य जनतेसाठी राज्यारोहणाच्या घोषणापत्राचे वाचन पूर्ण झाल्यानंतर राजघराण्याच्या सुरक्षा दलांकडून 41 तोफांची सलामी देण्यात आली. महाराणी एलिझाबेथ यांचच्या निधनानंतर दुखवटा म्हणून राजवाड्यावरील ध्वज निम्म्यावर फडकावण्यात आले होते. चार्ल्स यांच्या राज्यारोहणानंतर हे ध्वज पुन्हा उंचीवर फडकावले गेले.
मालमत्ता देशाला अर्पण केली –
राजघराण्याच्या प्रथेप्रमाणे नवनियुक्त राजे चार्ल्स यांनी आपली सर्व संपत्ती आणि उत्पन्न देशाला समर्पित करण्याची घोषणा केली. राज्यारोहण सोहळ्याप्रसंगी चार्ल्स यांच्या पत्नी राणी कॅमिला आणि त्यांचे पुत्र विल्यम्स हे देखील उपस्थित होते. युवराज विल्यम्स हे आता नवे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून ओळखले जाणार आहेत. राणी कॅमिला आणि विल्यम्स यांनी चार्ल्स यांच्या राजेपदाच्या घोषणापत्रावर औपचारिक स्वाक्षऱ्या केल्या.