Leopard Rescue : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस नागरी वस्ती सह पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याने, हिंगणीबेर्डी येथे मागील पाच दिवसांपूर्वी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यातील शिकार टिपण्यासाठी आलेला बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असून शेतातील गोट्यांमधील जनावरांवर बिबट्यांचे हल्ले होत आहेत. यामध्ये हिंगणीबेर्डी येथील हनुमंत छबुराव गोधडे यांच्या शेतातील गोठयातील शेळी बिबट्याने ठार केली होती. बोरीबेल येथील शेतकरी बाळकृष्ण पाचपुते यांच्या गाईचे वासरू सुद्धा बिबट्याची शिकार बनले होते. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बिबट्याचे ठसे दिसून येत आहेत. यापैकी आज हिंगणीबेर्डी येथील शेतकरी हनुमंत गोधडे यांच्या शेताजवळ वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या पकडण्यात आला आहे.मात्र दौंड तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांची संख्या किती हे मात्र समजू शकत नाही. पूर्वभागात भीमा नदी किनारी झाडे झुडपे आहेत.तसेच मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यानं दडण्यासाठी खूप जागा आहे. रात्री शिकारीच्या शोधत बाहेर पडत असून यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्यांचे हल्ल्यामुळे धोक्यात आले आहे . हिंगणीबेर्डी, आलेगाव, मलठण व बोरिबेल परिसरात शेतकऱ्यांना बिबटे दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कामाला मजूर येण्यास तयार नाहीत. नागरिक व शेतकरी बिबट्याच्या भीतीने सायंकाळी लवकर घराकडे येत आहेत. हिंगणीबेर्डी येथील बिबट्या जेरबंद करण्यासाठी तालुका वनपरिक्षेत्र आधिकारी राहुल काळे, वनरक्षक शुभांगी मुंडे, गोकुळ गवळी, शरद शितोळे, बाळू अडसूळ, पोलीस पाटील प्रवीण ढवळे, शेतकरी सागर गोधडे, शंकर जाधव,अमोल कामठे,विनोद भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले. बिबट्या पाहण्यासाठी परिसातील नागरिकांनी गर्दी केली होती. तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे हिंगणीबर्डी मध्ये वन विभागामार्फत पिंजरा लावण्यात आला होता. दि.५ रोजी शुक्रवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला . शेतकऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी बिबट्या आढळून आल्यास तात्काळ वन खात्याशी संपर्क करावा . – राहुल काळे (तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी)