बिबट्यांचा बंदोबस्त होणार! बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अजित पवारांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

प्रभात वृत्तसेवा
जांबूत – पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शाश्वत उपाययोजना निश्चित करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. पिंपरखेड येथील नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, मनुष्यहानी आणि पशुहानी टाळण्यासाठी त्वरित आणि निर्णायक उपाययोजना राबवण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी वन विभागाने हल्ले रोखण्यासाठी आणखी २०० पिंजऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले.
त्यानुसार आमदार अतुल बेनके यांच्या मागणीनुसार या २०० पिंजऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून २ कोटी २३ लाख रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करण्यात आला आहे. वन अधिकाऱ्यांना पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ही बैठक भविष्यातील उपायांसाठी दिशादर्शक ठरली असून, बिबट्यांशी संबंधित संकटावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाय राबविण्याचा निर्धार अधिक दृढ करण्यात आला आहे.
बैठकीत झालेल्या शाश्वत उपाययोजना..
आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील आकोले, पारनेर या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. माणिकडोह बिबट निवारण केंद्राची क्षमता वाढवण्यावर आणि शिरूर येथे नवीन रेस्क्यू सेंटर स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. बिबट्यांच्या नसबंदीबाबत केंद्रीय वनमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच पुढील बैठकीत तोडगा काढला जाईल.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून यापूर्वीच उच्च न्यायालयात अपील आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. बिबट हालचालींचे कार्यक्षम निरीक्षण करण्यासाठी बिबट प्रवण क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आणखी ५० युनिट्स वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकरी, मेंढपाळ आणि रेस्क्यू टीमला आवश्यक साहित्य पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सहमती झाली.





