Pune News : सिंहगड रोडवर दोघांकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त; रेकॉर्डवरील आरोपींना अटक
पोलीस अंमलदार विनायक मोहिते आणि राहुल ओलेकर यांना एकता नगरी परिसरातील पडीक इमारतीजवळ सूर्यराज निंबाळकर हा साथीदारासह येणार असल्याची आणि त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली.

Pune News : सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंगदरम्यान दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. सूर्यराज निंबाळकर आणि गौरव घाडगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके यांचे पथक १७ ऑक्टोबर रोजी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विनायक मोहिते आणि राहुल ओलेकर यांना एकता नगरी परिसरातील पडीक इमारतीजवळ सूर्यराज निंबाळकर हा साथीदारासह येणार असल्याची आणि त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. तेथे सूर्यराज मनोज निंबाळकर (वय २०, रा. गोकुळनगर, नऱ्हे) आणि गौरव राजू घाडगे (वय २०, रा. वडगाव बुद्रुक) हे दोघे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, सूर्यराजकडे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, तर गौरवकडे एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस आढळले.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१) व १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत घोरपडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.





