Neha Bora : ‘राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी परवानगीची गरज नसते’; नेहा बोराचा युक्तीवाद
आम्हाला राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी परवानगीची गरज नाही, असा युक्तीवाद नेहा बोराच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी केला.

Neha Bora – दिल्ली पोलिसांनी नेहा बोराने परवानगीशिवाय राष्ट्रध्वज फडकवला असल्याची नोटीस बजावली असून नागरिकांना राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी परवानगीची गरज नसते. प्रश्न हा आहे की या नोटीसमध्ये काही तथ्य आहे का? आम्हाला राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी परवानगीची गरज नाही, असा युक्तीवाद नेहा बोराच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी केला. दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद सुमारे तीन तास ऐकल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
न्या. सुब्रमणियम प्रसाद यांच्यासमोर ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोराने एका विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर शांतता बंधपत्र सादर करण्यास सांगणाऱ्या पोलीस नोटीसला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडली. दिल्ली पोलिसांच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी युक्तीवाद केला.
ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी युक्तीवाद केला की, विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी नोटीस बजावताना कोणताही विचार केला नव्हता आणि ते केवळ कॉपी-पेस्ट करण्याचे काम होते. नागरिकांना राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी परवानगीची गरज नसते. प्रश्न हा आहे की या नोटीसमध्ये काही तथ्य आहे का? त्यांना कायद्याचे शिक्षण घेण्याची गरज आहे, असे शंकरनारायणन म्हणाले.
यावर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी आक्षेप घेतला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, नोटीस बजावताना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर प्रचंड पुरावे उपलब्ध होते आणि त्यांनी त्यावर विचार केला होता.





