Amit Shah : आंदोलनांनी काहीही साध्य होणार नाही.! अमित शहा यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
दिल्लीत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून एक पूर्णपणे वेगळा राजकीय खेळ खेळला जात आहे. भाजप एकापाठोपाठ एक सत्तेवर येत आहे.

Amit Shah – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आंदोलने करण्यासाठी विरोधी पक्ष इतर राज्यांमधून पक्षाचे कार्यकर्ते गोळा करत आहे. मात्र, आंदोलनांनी काहीही साध्य होणार नाही.
तसेच निवडणूका जिंकायच्या असल्यास विरोधकांनी जनतेच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेससह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच भाजप ३० वर्षे सत्तेत राहील असा दावाही केला.
नवी दिल्लीत यमुना पुनरुज्जीवनासाठी ८,९४१ कोटींच्या ३३ प्रकल्पांचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला.
अमित शहा म्हणाले, राजकीय कसरती आणि जमावशाहीचा वापर करून जनतेचा कौल नाकारता येणार नाही. ज्या राज्यांत तुम्ही सत्तेत आहात, तिथे लोककल्याणकारी योजना राबवा अन्यथा उरलेल्या ठिकाणांहूनही तुमचा राजकीय पाया पूर्णपणे नष्ट होईल. काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणामुळे पुढील ३० वर्षे त्यांना सरकार स्थापन करता येणार नाही, असा दावा त्यांनी केला.
तसेच, केरळ, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामध्ये विरोधकांचे सरकार येते तेव्हा ईव्हीएम आणि निवडणूक आयोग चालतात. मात्र स्वतःचा पराभव झाला की त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, अशी टीकाही त्यांनी केली.
दिल्लीत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून एक पूर्णपणे वेगळा राजकीय खेळ खेळला जात आहे. भाजप एकापाठोपाठ एक सत्तेवर येत आहे. यामुळे व्यथित होऊन त्यांनी मतचोरीचे कारण पुढे केले आहे. भाजपला जनादेश नाही आणि ते मते चोरतात, असे ते म्हणत आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.






