Khandala Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर मृत्यूचा तांडव; खंडाळा तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा बळी
Khandala Accident : शिरवळ रेस्क्यू टीम आणि पोलिसांची घटनास्थळी धाव; मृतांच्या कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर, महामार्गावरील वाढत्या वेगाचा पुन्हा एकदा बळी.

Khandala Accident – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत झालेल्या अपघातामध्ये प्रकाश भिमाजी माने (वय 57, रा. धनगरवाडी, मूळ रा. बोरी, ता. खंडाळा) या पादचार्याचा महामार्ग ओलांडताना, तर केसुर्डी हद्दीतील पुलावर टेम्पोला दुचाकी धडकून, गणेश अनिल पवार (वय 25, रा. पाडळी, ता. खंडाळा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीधर भरत पवार (वय 36, रा. सिव्हिल कॉलनी, सातारा) हे टेम्पो (एमएच-50-एन-5544)घेऊन, पुण्याकडून सातार्याकडे जात होते. केसुर्डी हद्दीतील पुलावर टेम्पोचा टायर पंक्चर झाल्याने, श्रीधर पवार यांनी टेम्पो रस्त्याकडेला लावला. ते पंक्चर काढीत असताना पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे आलेल्या भरधाव दुचाकीने (एमएच-11-बीएन-6715) टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार गणेश पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीस आणि शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांन गणेश पवार यांचा मृतदेह शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. तेथे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत श्रीधर पवार यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धनगरवाडी हद्दीतील एका खाजगी कंपनीसमोरून प्रकाश भिमाजी माने हे महामार्ग ओलांडत असताना, सातार्याकडून पुण्याकडे निघालेल्या भरधाव कारने (एमएच-47-एयू-9698) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात माने यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस व शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी शिरवळ ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला.
तेथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत रामचंद्र मोटे यांच्या फिर्यादीवरून कारचालक दिनाकर शेषा हनाबा (वय 42, रा. करंजाई, पनवेल, नवी मुंबई) याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांचा तपास पोलीस अंमलदार संजय केंगले करत आहेत.





