Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सहा महिन्यांत दगडफेकीच्या 8, लुटमारीच्या 5 घटना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर सहा महिन्यांत दगडफेकीच्या ८ आणि लुटमारीच्या ५ घटना घडल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस उपाययोजना करत असून १५ मदत केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

Samruddhi Mahamarg : वेगवान प्रवासासाठी उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर आता प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपघातांसोबतच दगडफेक आणि लुटमारीच्या घटनाही समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात रविवारी रात्री कार आणि हायवा ट्रकवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडण्यात आल्या. याच्या आदल्याच दिवशी एका अभियंत्याला कारमधून प्रवास करताना लुटण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांत महामार्गावर दगडफेकीच्या ८, तर लुटमारीच्या ५ घटना घडल्या आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सहा महिन्यांत लुटमारीच्या ५ घटना –
समृद्धी महामार्गावर गेल्या सहा महिन्यांत लुटमारीच्या पाच घटना घडल्या आहेत.
– १२ मे : वैजापूर हद्दीत कार अडवून प्रवाशांना लुटले.
– २८ जुलै : सिंदखेड राजा परिसरात टायर पंक्चर करून वाहनातील रोकड चोरली.
– १५ ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगर हद्दीत चाकूचा धाक दाखवून प्रवाशांची लूट.
– २८ ऑगस्ट : महामार्गावर खिळे टाकून वाहनाचे टायर पंक्चर केले. त्यानंतर कुटुंबीयांकडील रोकड आणि दागिने लुटले.
– २ नोव्हेंबर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर हद्दीत कार्यकारी अभियंत्याला लुटले.
या घटनांमध्ये गुन्हेगार आलिशान वाहनांचा वापर करून प्रवाशांच्या गाड्यांचा पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर वाहने अडवून शस्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांना लुटले जात आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महामार्गावर प्रवेशासाठी टोलगेटची व्यवस्था असताना आणि ठरावीक ठिकाणीच बाहेर पडता येत असताना गुन्हेगार महामार्गावर प्रवेश कसा करतात, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
पोलिसांकडून सुरक्षा उपाययोजना –
वाढत्या घटनांची दखल घेत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी सावंगी इंटरचेंज परिसराची पाहणी केली. यावेळी महामार्गावरील काही भागांत मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याचे, तर काही ठिकाणी संरक्षण भिंतींची दुरवस्था झाल्याचे आढळले.
मोबाईल नेटवर्कची समस्या दूर करण्यासाठी टॉवर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, तुटलेल्या संरक्षण भिंतींची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. महामार्गावर गुन्हा घडल्यास पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून वाद न घालता प्रवाशांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे अतुलकर यांनी सांगितले.
प्रवाशांना पोलिसांचे आवाहन –
समृद्धी महामार्गावर प्रवास करताना कोणतीही अडचण आल्यास ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे लोकेशन कुटुंबीयांसोबत शेअर करावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महामार्गावर १५ पोलीस मदत केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. याशिवाय ४२० पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळालाही मान्यता मिळाली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिली. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.





