Udayanraje Bhosale: “बॅनरबाजी अन् अनावश्यक खर्च टाळा!”; खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थकांना आवाहन
Udayanraje Bhosale: श्री भवानी तलवार पूजन अन् शाही मिरवणुकीची परंपरा कायम; मात्र बॅनरबाजी आणि दिखाऊपणाला फाटा देण्याचे उदयनराजेंचे कार्यकर्त्यांना आदेश.

Udayanraje Bhosale- राज्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळाची दाहकता वाढली असून शेतकरी आणि पशुधनापुढे गंभीर संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर येथाल जलमंदिर पॅलेस येथे होणारा ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त अनावश्यक खर्च आणि बॅनरबाजी टाळावी तसेच दुष्काळग्रस्तांना शक्य ती मदत करावी,
असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. साताऱ्याच्या ऐतिहासिक परंपरेचा मानबिंदू असलेला शाही सीमोल्लंघन सोहळा हा केवळ राजघराण्याचा नसून संपूर्ण सातारकरांचा उत्सव आहे. या सोहळ्यात श्री भवानी तलवारीचे आणि आई तुळजाभवानीचे विधिवत पूजन, श्री भवानी तलवारीची शाही पालखी मिरवणूक,
पोवई नाक्यावरील ऐतिहासिक वेशीचे पूजन तसेच जलमंदिर पॅलेस येथे मिरवणुकीचे स्वागत, औक्षण आणि पूजन झाल्यानंतर आपट्याचे सोने स्वीकारण्याची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांपासून शासनही या सोहळ्यात सहभागी होत असून, पोलीस बँड पथकाद्वारे शाही सलामी दिली जाते. मात्र, यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
परतीच्या पावसानेही दगा दिल्याने अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, जनावरांचे संगोपन करणेही अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत शाही सीमोल्लंघन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करणे योग्य वाटत नसल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.
परंपरा कायम; मात्र अनावश्यक खर्चाला फाटा
शाही सीमोल्लंघन सोहळा प्रथा आणि परंपरेनुसार होणार असला, तरी तो अत्यंत साधेपणाने साजरा केला जाईल. या निर्णयाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. सोहळ्यानिमित्त अनावश्यक खर्च, बॅनरबाजी आणि दिखाऊपणाच्या कृती टाळाव्यात, असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातील अनावश्यक खर्चाला फाटा देत कार्यकर्ते आणि नागरिकांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा.





