बेंगळुरू – कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसने भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात 9 मार्च रोजी पुकारलेला दोन तासांचा बंद परीक्षांच्या कारणामुळे मागे घेण्यात आला आहे. सध्या राज्याच्या सर्वच भागात विविध परीक्षा सुरू आहेत. या बंदमुळे विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपचे आमदार विरूपक्षप्पा यांच्या मुलाच्या घरात तब्बल आठ कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. त्या आधी त्याला सहा लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांकडून रंगेहाथ पकडण्यात आले होते.
तथापि, अजून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही, या कारणावरून तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसने हा बंद पुकारला होता. तथापि, कॉंग्रेस श्रेष्ठींशी परीक्षेच्या विषयावर चर्चा झाल्यानंतर हा बंद मागे घेण्याचा निर्णय झाला आहे.