लखनौ – उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर काही ठिकाणी हिंसाचार उसळला. या प्रकरणातील मास्टर माईंड जफर हयातचा पोलीस शोध घेत होते. यासाठी पोलिस आणि गुन्हे शाखेची अनेक पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी शनिवारी दुपारी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. हयातला गुन्हे शाखेने लखनौ येथून अटक केली आहे. हयात जफर हाश्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याने यापूर्वी अनेकदा लोकांना भडकवले आहे. सीएए आणि एनआरसी निषेधादरम्यानही तो खूप सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.
हिंसाचारामागे अनेक कटकारस्थान –
या हिंसाचारामागे इतरही अनेक लोक असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, ज्यांनी गर्दी जमवून गोंधळ घातला अशा लोकांची माहिती पोलिस गोळा करत आहेत. गुप्तचर विभागही अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या इतर अनेक शाखांनीही गुप्त पद्धतीने तपास सुरू केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांमध्ये नाराजी असून, शुक्रवारच्या नमाजानंतर कानपूरमध्ये गोंधळ झाला. दरम्यान, अल्पसंख्याक समाजाचे लोक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि लोकांना हुसकावून लावले. जोहर फॅन्स असोसिएशन आणि इतर मुस्लिम गटांनी याआधीच मुस्लिम समाजाला शुक्रवारी व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. याचदरम्यान हा वाद चव्हाट्यावर आला.
दरम्यान, या हिंसाचारात 35 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 36 जणांची नावे दिली आहेत, तर 18 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी एकूण तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कानपूरच्या घटनेबाबत एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, काही लोकांनी दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला, त्याला दुसऱ्या बाजूच्या लोकांनी विरोध केला. त्यामुळे हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.