नवी दिल्ली – पाकिस्तानच्या हंगामी पंतप्रधानपदी अन्वर उल हक काकर यांचा आज शपथविधी झाला. पुढील सार्वत्रिक निवडणूका होईपर्यंत देशाचा कारभार पाहण्यासाठी आणि निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी काकर यांच्यावर असणार आहे.
पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये प्रथमच निवडले गेलेले 52 वर्षीय काकर हे बलुचिस्तानमधील पश्तुनवंशीय असून बलुचिस्तान आवामी पार्टीचे सदस्य आहेत. त्यांचा हा पक्ष देशाच्या ताकदवान लष्कराच्या निकटचा मानला जातो आहे. इस्लामाबादेत अध्यक्षांच्या “ऐवान ए सद्र’ या निवासस्थानी झालेल्या समारंभामध्ये अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी काकर यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. काकर हे पाकिस्तानचे 8 वे हंगामी पंतप्रधान ठरले आहेत.
शपथविधीच्या आगोदर काकर यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यत्वाचा आणि त्यांनीच 2018 मध्ये स्थापन केलेल्या बलुचिस्तान आवामी पार्टीचाही राजीनामा दिला. तटस्थ आणि निःपक्ष पंतप्रधान राहण्यासाठी त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. निवडणूक आयोगाबरोबर मिळून देशात मुक्त आणि पारदर्शत वातावरणामध्ये निवडणुका पार पाडणे ही आपली जबाबदारी असल्यामुळे त्यांनी हे राजीनामे दिले आहेत. सिनेटच्या सचिवांनी त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काकर यांनी राजीनामा दिल्यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील त्यांचे पद रिक्त झाले आहे.
पंतप्रधान शेहबाझ शरीफ आणि विसर्जित संसदेमधील विरोधी नेते राजा रियाज अहमद यांच्यामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान काकर यांच्या नावावर एकमत झाले होते. काकर यांच्या हंगामी पंतप्रधानपदाच्या काळामध्ये देशात पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पडतील, असा विश्वास माजी पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी व्यक्त केला आहे. काकर हे सुशिक्षित व्यक्ती आणि देशभक्त असल्याने सर्व पक्षांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.