लंडन – दीर्घकाळ संसार केल्यानंतर काही कारणाने न पटल्यामुळे पती आणि पत्नीने घटस्फोट घेणे ही वेदनादायक गोष्ट असली तरी केंटमधील एका इसमाने मात्र 23 वर्षाच्या संसारानंतर झालेला आपला घटस्पोट साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अग्नस कॅनडी असे या इसमाचे नाव असून तो 58 वर्षाचा आहे. तेवीस वर्ष संसार केल्यानंतर त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला.
जानेवारी 2023 मध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याने ही प्रक्रिया साजरी करण्याचा निर्णय घेतला त्याने त्याच्या मालकीची कार संपूर्णपणे सजवली असून त्यामध्ये त्याने आपल्या या घटस्फोटाची जाहिरात केली आहे. नवविवाहित जोडपी जेव्हा कारवर जस्ट मॅरीड अशी जाहिरात करतात त्याच प्रकारने त्याने आपल्या कारवर जस्ट डायवोर्सड अशी जाहिरात केली आहे.
फ्रीडम ॲटलास्ट अशा प्रकारची काही वाक्यही त्याने या कारवर मुद्रित केली आहेत. त्याने आपला पत्नी बरोबर घटस्फोट घेतला असला तरी त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. या दांपत्याला पाच मुले असून ते दोघे संयुक्तपणे या पाच मुलांचा सांभाळ करणार आहेत. घटस्फोटानंतर केनेडीने विचित्र पद्धतीने आपली कार रंगवल्यानंतर त्याच्या पत्नीलाही गंमत वाटली. पण तिने त्याबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही. आता या सर्व प्रक्रियेचा पुढचा भाग म्हणून केनेडी चर्चमध्ये जाणार असून तेथे आपली नोंद अनमॅरीड अशी करणार आहे.
23 वर्षांपूर्वी आपल्या पत्नी बरोबर लग्नाच्या आणाभाका घेताना त्याने जी विधाने केली होती ती मागे घेतली जावीत अशी ही विनंती तो चर्चला करणार आहे. केनेडीच्या पत्नीचे नाव सोफी असे असून तिनेही आपल्या घटस्फोटानंतरही मैत्री कायम ठेवणे मला आवडेल असे तिने म्हटले आहे. मुलांच्या मनावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही सौहार्दाच्या वातावरणात आमचा विवाह संपवला आणि घटस्फोट घेतला असे तिने म्हटले आहे.