Junnar Crime: अल्पवयीन मुलांच्या हातात दारूच्या बाटल्या! जुन्नर तालुक्यात नियम धाब्यावर, प्रशासन गाढ झोपेत?
Junnar Crime: अधिकृत दुकानांतून खेड्यापाड्यांत अनधिकृत दारूचा पुरवठा; रात्रीच्या वेळी होणारे वाद, अपघात आणि चोऱ्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर.

– संजय थोरवे
Junnar Crime – जुन्नर तालुक्यातील देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने, परमिट रूम आणि बिअर बारमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलांना दारू विक्री होत असल्याचे आरोप होत असून, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. जुन्नर तालुक्यात नारायणगाव, जुन्नर आणि आळेफाटा येथे देशी-विदेशी दारूची दुकाने आहेत. याशिवाय तालुक्यात मोठ्या प्रमाणात परमिट रूम आणि बिअर बार आहेत. दारू विक्रीची दुकाने तसेच परमिट रूम व बिअर बार सुरू व बंद करण्याची वेळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने निश्चित केली आहे.
तसेच मद्यविक्री करताना ग्राहकाच्या वयोमर्यादेसह विविध नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. दारू विक्री करणार्या दुकानदारांनी ग्राहकाची वयोमर्यादा तपासणे आवश्यक असताना काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही दारू विकली जात असल्याचा आरोप होत आहे.
केवळ व्यवसाय वाढविण्याच्या उद्देशाने नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या आरोपांची संबंधित विभागाने प्रत्यक्ष तपासणी करून सत्यता पडताळणे आवश्यक आहे. तालुक्यातील दारू विक्रीच्या दुकानांमधून व्हॅन, कार यांसारख्या छोट्या वाहनांतून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
ही दारू धाबे, खेडोपाडी तसेच वाड्या-वस्त्यांवर अनधिकृतपणे विकली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अधिकृत दुकानातून होणार्या विक्रीपासून ते अनधिकृत ठिकाणी होणार्या विक्रीपर्यंतच्या संपूर्ण साखळीची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. परमिट रूम व बिअर बार परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार्या मद्यसेवनामुळे भांडणे, शिवीगाळ आणि गोंधळाच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी आहेत.
मद्यसेवन करून वाहन चालविल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचीही नागरिकांची चिंता आहे. रात्रीच्या वेळी चोरीसारख्या घटना वाढत असल्याची चर्चा असली, तरी त्याचा थेट संबंध दारू विक्रीशी आहे का, याचीही अधिकृत आकडेवारी व तपासणी आवश्यक आहे. जुन्नर तालुक्यात अनधिकृत दारू विक्रीच्या तक्रारी वाढत असताना संबंधित विभागाने केवळ किरकोळ कारवाई करून प्रकरण संपविण्याऐवजी दारूचा पुरवठा,
वाहतूक, विक्रीची ठिकाणे, बारच्या वेळा आणि अल्पवयीनांना होणारी विक्री यांची एकत्रित तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. पुणे ग्रामीणचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन संयुक्तपणे तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि आरोपांमध्ये तथ्य नसल्यास वस्तुस्थितीही नागरिकांसमोर स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






