Alephata : ७५ हजारांची गाय अवघ्या सहा हजारांत
Alephata : आळेफाटा बाजारात जनावरे घेऊन आलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.ज्या गायीला कधीकाळी ७५ हजार रुपये मोजून घरात आणले, तिची किंमत आज अवघी सहा हजार रुपये मिळत असल्याचे चित्र शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेची तीव्रता दाखवून देते.

आळेफाटा : एकीकडे वाढती महागाई, तर दुसरीकडे चारा-पाण्याचा प्रश्न… या दुहेरी संकटात शेतकरी अक्षरशः होरपळून निघत आहे. याचीच हृदयद्रावक झलक गुरुवारी आळेफाटा येथील गाई बाजारात पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वी ७५ हजार रुपये मोजून घेतलेली दुधाळ गाय चक्क सहा हजार रुपयांत विकण्याची वेळ एका शेतकऱ्यावर आली.दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपलेल्या जनावरां पासून दूर होण्यास भाग पाडले आहे.
परिसरात चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस कठीण होत आहे.दूध देणाऱ्या गायी म्हणजे केवळ जनावरे नव्हेत,तर अनेक शेतकरी कुटुंबांच्या घरखर्चाचा आधार आहेत.पहाटे उठल्यापासून त्यांची सेवा करणारा शेतकरी त्यांना लेकराप्रमाणे जपत असतो.मात्र,आज त्याच लेकरांना बाजारात विक्रीसाठी उभे करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
आळेफाटा बाजारात जनावरे घेऊन आलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.ज्या गायीला कधीकाळी ७५ हजार रुपये मोजून घरात आणले, तिची किंमत आज अवघी सहा हजार रुपये मिळत असल्याचे चित्र शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेची तीव्रता दाखवून देते.
“गाय विकताना मनाला खूप वाईट वाटतंय.घरातील माणसासारखी जपली; पण आता तिच्यासाठी चारा-पाणी आणण्याचीही ऐपत राहिलेली नाही,”अशी भावना आळेफाटा गायी बाजारात एका शेतकऱ्याने व्यक्त केली. दुष्काळाचा परिणाम केवळ शेतातील पिकांवर होत नाही, तर शेतकऱ्याच्या गोठ्यातील प्रत्येक जीवाच्या आयुष्यावरही होतो,हे आळेफाटा बाजारातील दृश्यांनी अधोरेखित केले.ग्रामीण भागातील या वेदनेची झळ शहरांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
कारण शेतकऱ्याच्या गोठ्यातील गाय ही केवळ जनावर नसून त्याच्या संसाराचा आणि भावविश्वाचा एक अविभाज्य भाग असते.दुष्काळाने पिके करपली;आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील माणुसकी आणि मायेचीही परीक्षा सुरू झाली आहे.





