Alephata : गाळ हटणार, पाणीसाठा वाढणार
Alephata : बंधार्यात अधिक पाणी साठल्याने पावसाळ्यानंतरही ते अधिक काळ उपलब्ध राहू शकणार आहे. तसेच पाण्याचा जमिनीत मुरण्याचा वेग व प्रमाण वाढल्यास भूजलपातळीत सुधारणा होण्यास मदत होईल.

आळेफाटा : पावसाचे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी अधिकाधिक उपयोग व्हावा, या उद्देशाने आळे येथे जलसंधारणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. उकळीचा महादेव मंदिराजवळील सिमेंट बंधार्यात साचलेला गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्याच्या कामाला सोमवारी (दि. 26) प्रारंभ झाला.
आयटीसी मिशन सुनहरा कलच्या कृष्णा खोरे जलसंसाधन व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर (डीएससी) यांच्या पुढाकारातून हे काम हाती घेण्यात आले आहे. बंधार्यातील गाळ काढून खोली वाढवल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून, त्याचा परिसरातील शेतीला थेट लाभ होण्याची अपेक्षा आहे. बंधार्यात अधिक पाणी साठल्याने पावसाळ्यानंतरही ते अधिक काळ उपलब्ध राहू शकणार आहे. तसेच पाण्याचा जमिनीत मुरण्याचा वेग व प्रमाण वाढल्यास भूजलपातळीत सुधारणा होण्यास मदत होईल. परिणामी, परिसरातील विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता वाढण्याची शक्यता असून, सिंचनासाठीही अधिक पाणी मिळू शकते.
कामाच्या प्रारंभी प्रकल्प अभियंता संदेश पाटील यांनी जलसंधारण, पाण्याचे नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन याबाबत माहिती दिली. प्रकल्प व्यवस्थापक दिग्विजय शर्मा यांनी जलसंधारणाची कामे केवळ बांधकामापुरती मर्यादित न ठेवता, त्यातून शेतकर्यांना दीर्घकालीन लाभ मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समुदाय मोबिलायझर तुषार कुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी आळेगावचे माजी सरपंच मुकुंद भंडलकर, माजी उपसरपंच मंगेश कुर्हाडे, तलाठी मुंगळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र कुर्हाडे, गणेश अप्पा शिंदे, संतोष शिंदे, गोविंद शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
बंधार्याच्या खोलीकरणामुळे ‘अडवा, जिरवा आणि साठवा’ या जलसंधारणाच्या उद्दिष्टाला बळ मिळणार आहे. आगामी काळात परिसरातील शेतीसाठी हा जलसाठा महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





