Alephata : कांदालागवडीचा खर्च लाखाच्या उंबरठ्यावर
Alephata : कांदा हे मजूरप्रधान पीक असल्याने मजुरीच्या वाढलेल्या दरांचा उत्पादन खर्चावर थेट परिणाम होत आहे. सध्या महिला मजुराला दिवसाला सुमारे 650 रुपये, तर पुरुष मजुराला 800 रुपये मजुरी द्यावी लागत आहे.

आळेफाटा : कांदा लागवडीचा वाढता खर्च आणि पाण्याची अनिश्चितता यामुळे आळेफाटा परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाच्या छायेत आहेत. नव्या हंगामासाठी शेतशिवारात लागवडीची लगबग सुरू झाली असली, तरी लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी 90 ते 95 हजार रुपये खर्च होत असल्याने उत्पादन खर्च लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यातच पावसाची अनिश्चितता आणि दुष्काळाची शक्यता यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
पिंपरी पेंढार, खामुंडी, नवलेवाडी, वडगाव आनंद आणि पिंपळवंडी परिसरात कांदा लागवडीच्या कामांना वेग आला आहे. सध्या शेतांची मशागत, फणणी, रोटर मारणे, सरी पाडणे, शेत बांधणी आणि कांदा रोपांची लागवड सुरू आहे. कांदा हे माळशेज परिसरातील अनेक शेतकर्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याने दरवर्षी मोठ्या अपेक्षेने या पिकाची लागवड केली जाते. मात्र, यंदा मजुरी, खते, कीटकनाशके, रोपे आणि पाणी व्यवस्थापनाचा खर्च वाढल्याने लागवड करावी की नाही, असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.
कांदा हे मजूरप्रधान पीक असल्याने मजुरीच्या वाढलेल्या दरांचा उत्पादन खर्चावर थेट परिणाम होत आहे. सध्या महिला मजुराला दिवसाला सुमारे 650 रुपये, तर पुरुष मजुराला 800 रुपये मजुरी द्यावी लागत आहे. लागवड, खुरपणी, फवारणीसाठी पूरक कामे आणि काढणी या टप्प्यांवर मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. त्यात वेळेवर मजूर उपलब्ध न झाल्यास कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो.
कांदा पिकासाठी मशागत, फणणी, रोटर मारणे आणि सरी पाडण्यासाठी एकरी सुमारे चार हजार रुपये खर्च होतो. शेत बांधणीसाठी तीन हजार, लागवडीच्या मजुरीसाठी 12 हजार, तर कांदा रोपांची खरेदी व उपटणीसाठी जवळपास 18 हजार रुपये खर्च येतो. रासायनिक खतांच्या दोन डोससाठी 15 हजार रुपये, कीटकनाशकांच्या फवारणीसाठी 15 हजार, पाणी भरण्यासाठी आठ हजार आणि काढणीच्या मजुरीसाठी आणखी 17 हजार रुपये खर्च होतो. या खर्चाची बेरीज 92 हजार रुपये होते. त्यात पाणी, फवारणी किंवा इतर अनपेक्षित खर्च वाढल्यास एकरी गुंतवणूक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. एवढा खर्च करूनही बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळेल, याची खात्री नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
नदीकाठाला आधार; पठार भागात चिंता
आळेफाटा परिसरात पाण्याची उपलब्धता भागानुसार वेगवेगळी आहे. नदीकाठच्या आणि कालव्यालगतच्या भागातील शेतकर्यांना उपलब्ध पाण्याच्या आधारे शेती करता येत असली, तरी आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत त्यांच्याही मनात चिंता आहे. दुसरीकडे, पठार भागात पाण्याची परिस्थिती अधिक गंभीर असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाने अपेक्षित साथ न दिल्यास विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसू शकतो. एकीकडे लागवडीसाठी मोठी गुंतवणूक करावी लागत असताना दुसरीकडे पाणी उपलब्ध होईल की नाही, हा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे.
चाळींतील कांदाही अपेक्षित परतावा देईना
गेल्या हंगामातील अनेक शेतकर्यांचा उन्हाळी कांदा अद्याप चाळींमध्ये साठवून ठेवलेला आहे. आळेफाटा बाजार समितीतील सध्याच्या बाजारभावानुसार प्रतिदहा किलो गोळा कांद्याला 450 ते 500 रुपये, सुपर कांद्याला 380 ते 460 रुपये, गोल्टी व गोल्टा कांद्याला 201 ते 411 रुपये, तर बदला कांद्याला 100 ते 301 रुपये दर मिळत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. मात्र, बाजारभावातील चढ-उतारामुळे सर्वच शेतकर्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही. नव्या हंगामासाठी हजारो रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर बाजारात दर घसरल्यास उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, अशी चिंता उत्पादक व्यक्त करत आहेत.
कांदा पिकवायचा तरी कशाच्या भरवशावर?
वाढता उत्पादन खर्च, मजुरीचे चढे दर, महागडी खते-औषधे, पाण्याची अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार या सगळ्यांचा एकत्रित परिणाम कांदा उत्पादकांवर होत आहे. नदीकाठच्या भागाला उपलब्ध पाण्याचा काहीसा आधार असला, तरी पठार भागातील शेतकर्यांसाठी आगामी हंगामाचे यश पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून राहणार आहे. लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला खर्च आणि उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसल्याने परिसरातील शेतकर्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे, कांदा पिकवायचा तरी कशाच्या भरवशावर? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.





