मुंबई – अभिनेत्री जुई गडकरी (Jui gadkar) ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे सध्या चर्चेत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता जुईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. येत्या काही दिवसांत दिवाळी सण देशभरात साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जुई दिवाळी आश्रमातील मुलांसोबत, कुष्ठरोगाशी सामना करणाऱ्यांसोबत साजरा करणार आहे. याबाबत तिने चाहत्यांनाही मदतीचे आवाहन करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
जुईने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, ‘माझी दरवर्षीची दिवाळी मी पनवेलमधील नेरेगाव येथील शांतीवन आश्रमातून सुरू करते. माझ्या काही मित्रमैत्रिणींसोबत मी शांतीवन आश्रमात जाते. यंदा हे माझं 19 वे वर्ष आहे. तिथे कुष्ठरोगाने त्रस्त असणारे काही पेशंट आहेत, निराधार आजीआजोबा आहे, तिथे वृद्धाश्रमही आहे. आम्ही येथे आश्रम सजवतो, त्यांच्यासोबतच तिथे जेवतो आणि नाच-गाण्याचे कार्यक्रमही करतो. तिथे आम्ही देणगीही देतो, जेणेकरुन तिथल्या लहान मुलांना, आजीआजोबांना, पेशंटना त्याचा उपयोग करता येईल. जमेल तसे पैसे जमा करुन आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो.’
पुढे तिने सांगितले की, ‘गेले अनेक वर्ष फेसबुक-इन्स्टाग्रामवरुन काही लोक मला मदत करत आहेत, देणगीसाठी हातभार लावत आहेत. यावर्षीही कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर तिला मेसेज करावा. त्यानंतर जुई बँक तपशील शेअर करेल आणि ही मदत गरजूंपर्यंत पोहोचवेल. जुईने सर्वांना खात्री दिली की या पैशांचा गैरवापर केला जाणार नाही तर आश्रमातील माणसांपर्यंत नक्कीच पोहोचेल. चांगल्याच कामासाठी त्याचा वापर होईल.’
View this post on Instagram
यावेळी तिने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यामागचा हेतु देखील सांगितला आहे. अभिनेत्रीने हे काम करण्याचा हेतू सांगताना असे म्हटले की, ‘आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो. त्यामुळे एक दिवस त्यांच्यासाठी द्यायला काहीच हरकत नाही. त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढचं संपूर्ण वर्ष छान राहतो. ते आशीर्वाद खूप गरजेचे असते. गेले 19 वर्ष मी तिथे जातेय आणि सातत्याने वसूबारस हा दिवस त्यांच्यासोबत साजरा करतो. विश्वास ठेवा माझ्यावर तिथे गेल्यानंतर त्यांचे चेहरे खरंच बघण्यासारखे असतात, वर्षभर ते या दिवसाची वाट पाहत असतात.’ या व्हिडिओनंतर तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.