पुणे – व्हिजन स्पोर्टस् सेंटर तर्फे आयोजित जोशी स्पोर्टस प्रिमिअर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत रायझिंग चॅम्पियन आणि गट्स अँड ग्लोरी क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
व्हिजन क्रिकेट अकादमी मैदान, सनसिटी रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गौरव बाबर याच्या 72 धावांच्या खेळीमुळे रायझिंग चॅम्पियन संघाने स्पार्टन्स् क्रिकेट क्लबचा 2 गडी राखून पराभव करून विजयी कामगिरी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने 178 धावांचे आव्हान उभे केले. किरण दातार याने 32 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 85 धावा चोपल्या. यामध्ये गौरव बाबर याने 21 धावात 2 गडी बाद केले. हे आव्हान रायझिंग चॅम्पियनने 19.4 षटकात व 8 गडी गमावून पूर्ण केले. गौरव बाबर याने 53 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 72 धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
शुभम हरणे याच्या 74 धावांच्या खेळीमुळे गट्स अँड ग्लोरी क्लबने रायझिंग चॅम्पियनचा 43 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गट्स अँड ग्लोरी क्लबने 163 धावा धावफलकावर लावल्या. शुभम हरणे याने 32 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 74 धावांची खेळी केली. या आव्हानासमोर रायझिंग चॅम्पियनचा डाव 120 धावांवर मर्यादित राहीला. गौरव कर्वे (3-21), शुभम हरणे (2-22), ऋत्विक महाजन (2-22) आणि कुणाल गुप्ता (2-21) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाचा विजय साकार केला.