‘जसा राजा, तशी प्रजा’, तुम्ही फक्त मजा पाहत राहा! देवेंद्र फडणवीसांवर आव्हाडांची लेक संतापली

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानभवनात कायदा बनवणाऱ्या पवित्र परिसरातच कायदा आणि सुव्यवस्थेचा धिंडवडा निघाला. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी एकमेकांवर हात उगारत गावगुंडांप्रमाणे हाणामारी केली. कॉलर धरून, शिवीगाळ करत आणि कपडे फाडत दोन्ही गटांनी विधानभवनाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासला.
या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सर्वसामान्यांमध्येही संतप्त भावना व्यक्त होत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिने सोशल मीडियावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वादच मूळ कारण काय?
हा वाद मागील आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना ‘मंगळसूत्र चोर’ असा टोमणा मारल्याने सुरू झाला. या टिप्पणीचा राग मनात ठेवून बुधवारी पडळकर यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आव्हाड यांना शिवीगाळ केली. याच वैमनस्यातून दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले. बुधवारी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास विधानभवनाच्या तळमजल्यावर हा राडा झाला.
आव्हाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक हृषीकेश टकले यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. पण, काही वेळातच ही भांडणे हाणामारीत बदलली. टकलेने देशमुख यांच्या शर्टाची कॉलर पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली, तर देशमुख यांनीही प्रत्युत्तर दिले. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सुरक्षा रक्षकांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
जसा राजा, तशी प्रजा; नताशा आव्हाडचा संताप
सोशल मीडियावर नताशाआव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट्स शेअर झाल्या. पडळकर यांच्या समर्थकांनी लिहिलेल्या या पोस्ट्समध्ये नताशाला अत्यंत खालच्या भाषेत टार्गेट करण्यात आले. एका पोस्टमध्ये असे लिहिण्यात आले की, ज्याच्या पोरीने मंगळसूत्र घालणारा न निवडता इतरधर्मीय निवडला, तो आता मंगळसूत्राच्या नावाने गावभर बोंबलत आहे.
यासह अश्लील आणि अपमानास्पद भाषेचा वापर करत आव्हाड कुटुंबाला टार्गेट करण्यात आले. यावर नताशा आव्हाडने त्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे. या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढले जात आहे. @Dev_Fadnavis @MumbaiPolice तुम्ही मजा पाहत राहा फक्त!
जसा राजा, तशी प्रजा! सगळे गुंडे.
या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडून मला यात ओढले जात आहे.@Dev_Fadnavis @MumbaiPolice तुम्ही मजा पाहत राहा फक्त! pic.twitter.com/pG6a1dTYkQ
— Natasha Awhad (@NatashaASpeaks) July 17, 2025
हृषीकेश टकलेला सुरक्षा रक्षकांनी दिली तंबाखू मळून
हाणामारीच्या या घटनेत सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यकर्त्यांना वेगळे केले. मात्र, याच दरम्यान हृषीकेश टकले याला सुरक्षा रक्षकांनी तंबाखू मळून दिल्याचा गंभीर आरोप आव्हाड आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केला आहे. या तक्रारीमुळे विधानभवनातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कोण आहे हृषीकेश टकले?
हृषीकेश ऊर्फ सर्जेराव बबन टकले हा शिव मल्हार क्रांती सेनेचा सांगली जिल्हाध्यक्ष आहे. त्याच्याविरुद्ध 2016 ते 2021 या कालावधीत सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्यावर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यांतर्गतही कारवाई झाली आहे. यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.
विधानभवनाची प्रतिष्ठा धोक्यात
ही अभूतपूर्व घटना विधानभवनाच्या इतिहासात कधीही घडली नव्हती. कायदे बनवणाऱ्या या पवित्र परिसरात अशा प्रकारे गावगुंडगिरी आणि शिवीगाळ होणे, यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, नताशा आव्हाड यांच्यावरील सोशल मीडियावरील आक्षेपार्ह टिप्पण्यांवर पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





